एमआयटी एडीटी विद्यापीठ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांचा उपक्रम
Thenewzbiz Team, पुणे :
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय भाषांतील पंधरा लिपी एकत्र करून भारतातील 15 सुलेखनकार आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संगीत कला अकादमीच्या 15 विद्यार्थ्यांद्वारे ‘अक्षरभारत’ संकल्पनेअंतर्गत पंधरा भारतीय लिपींमध्ये राष्ट्रगीत साकारण्यात आले आहे.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ आणि सुलेखनकार अच्युत पालव यांनी ‘अक्षरभारत’ संकल्पनेअंतर्गत भारताचे राष्ट्रगीत विविध लिप्यांमध्ये साकारले आहे. यामध्ये देवनागरी, ओडिसा, तेलुगु, कन्नडा, मल्याळम, गुजराथी, उर्दु, तामिळ, गुरूमुखी, मोडी, काश्मिरी, बंगाली, असामी, मैथिली, सिद्धम अशा पंधरा लिपींचा समावेश आहे. त्यात अच्युत पालव, एस. के. मोहंती, नवाकांथ करीडे, जी. व्ही. स्त्रीकुमार, नारायण भट्टथीरी, गोपाल पटेल, महमूज अहमद शेख, मनोज गोपीनाथ, प्रभसिमर कौर. केतकी गायधनी, अन्वर लोलाबी, हिरेन मित्रा, मनीषा नायक, रुपाली ठोंबरे आणि अवधूत विधाते यांचा समावेश आहे. तसेच एमआयटी संगीत कला अकादमीचे सचिव अदिनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कला अकादमीच्या 15 विद्यार्थ्यांनी हे राष्ट्रगीत स्वरबद्ध केले आहे.
एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्टस्चे प्रा. तुषार पनके यांनी संकलन, तर कुणाल कुलकर्णी यांनी ध्वनीसंकलन केले. करणसिंग चौहान, आयुषी ढबाळे, प्रशांत नाईकवाडे, लीशा कुंजीर, अर्थ कुमार, ईशानी पवार, संकेत कांबळे, अर्पित कोमल, प्रेरणा डागा, ऐश्वर्या तालकेरी, स्वप्नाली गायकवाड, इल्तेमाश खान, इशिका सक्सेना, अश्विनी सक्सेना, विनित भैयानी, नीधी पाडळकर, अर्थव भदाडे, सर्वोत्म कुलकर्णी आणि अभ्रनील ओक या राष्ट्रगीतचे गायन केले आहे.
पंधरा भारतीय लिपींमध्ये साकारलेल्या राष्ट्रगीताचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश कराड, ज्योती कराड-ढाकणे यांच्या हस्ते अक्षरभारत कार्यक्रमाचे लाँचिंग 14 ऑगस्ट रोजी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम या डिजिटल प्लाटफार्मवरून करण्यात आले. यावेळी एमआयटी संगीत कला अकादमी सचिव अदिनाथ मंगेशकर, एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्टस् चे अधिष्ठाता प्रा. डॉ. मिलिंद ढोबळे, प्रा. तुषार पंके आदी उपस्थित होते.









Leave a Review