इंद्रायणी महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा दिन’ उत्साहात साजरा

Share this Newz

तळेगाव दाभाडे : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या, इंद्रायणी महाविद्यालयातील मराठी विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिजात मराठी भाषा दिन’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रंथपूजन, व्याख्यान, ग्रंथालय भेट, प्रश्नमंजुषा स्पर्धा, माझा ब्लॉग माझी ओळख इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते ग्रंथपूजनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी अभिजात मराठी भाषेची वाटचाल तसेच इतर भाषा यांच्या आढावा घेत त्यांच्या ‘अस्वस्थ भवताल’ या कवितासंग्रहातील कवितेचे सादरीकरण केले. तसेच डॉ. संभाजी मलघे यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी भाषेला लाभलेली प्रदीर्घ साहित्यपरंपरा, प्राचीन वाङ्मयीन वारसा, संत साहित्याचे योगदान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यामुळे मराठी भाषेचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही प्रत्येक मराठी भाषिकासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, हा अभिमान केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर, वाचनसंस्कृतीची जोपासना आणि नव्या पिढीमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मराठीतील पुस्तके वाचावीत, साहित्यिकांच्या विचारांचा अभ्यास करावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही मराठी भाषेचा प्रसार करावा” असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी मराठी विषय घेऊन आयएस, आयपीएस झालेल्या अधिकाऱ्यांची उज्ज्वल परंपराही सांगितली.

प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या आकाश जोशी या विद्यार्थ्याने ‘माझा ब्लॉग, माझी ओळख’ या उपक्रमांतर्गत उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या ब्लॉगचे सादरीकरण केले. ग्रंथालय भेटीमध्ये विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश, इतर संदर्भ कोश, नवीन आलेली पुस्तके यांचा परिचय करून देण्यात आला. तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख, इंगजी विभागप्रमुख डॉ.दीप्ती पेठे, अनिकेत बोकरे, डॉ. शिवाजी कार्ले, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. रूपकमल भोसले तसेच पदवी आणि पद्वव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेविषयी अभिमान आणि जिव्हाळा निर्माण करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर डॉ. विनया केसकर यांनी आभार मानले.


Share this Newz