सासवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटनानिमित्त पुरुषोत्तम करंडक २०२६ स्पर्धेतील विजेत्या संघाच्या अनुभवकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पुरुषोत्तम करंडक २०२६ (पुणे विभाग) व हरी विनायक करंडक स्पर्धेत ‘आठवडे बाजार’ ही एकांकिका सादर करून सांघिक द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या संघातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलाप्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा अनुभव नवोदित कलाकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अनुभवकथनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आस्था काळे, मयूर गायके, दिपाली धुमाळ, आयुश्री मिश्रा आणि संस्कार फडके यांनी ‘आठवडे बाजार’च्या तालमीपासून अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास उलगडला. भूमिकेची तयारी, व्यक्तिरेखा समजून घेणे, संवादफेक, दिग्दर्शन, समूहातील समन्वय, तालमीसाठी दिलेला वेळ आणि स्पर्धेच्या वातावरणातील आव्हाने याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले.
‘स्क्रिप्टशिवाय मी आज तुमच्यासमोर उभा आहे,’ असे सांगताना मयूर गायके यांनी रंगभूमीच्या अनुभवातून आत्मविश्वास आणि व्यक्त होण्याची क्षमता विकसित झाल्याचे नमूद केले. तालमीदरम्यान झालेल्या चुका, त्यातून घेतलेले धडे, सहकलाकारांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी होत गेले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
पुरुषोत्तम करंडकातील यशामागे केवळ रंगमंचावरील सादरीकरण नसून सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, संघभावना, वेळेचे नियोजन आणि कलाकृतीविषयीची बांधिलकी महत्त्वाची ठरल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. तालमीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने मात करत अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास कसा घडला, याचे अनुभव त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी शेअर केले.
यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती, नाट्य आणि विविध सर्जनशील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. रंगभूमीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. पुरुषोत्तम करंडकातील यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून विद्यार्थ्यांना भविष्यातही आवश्यक संधी व प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रामकृष्ण मोरे प्रतिष्ठानच्या वतीने मीरा चिकणे यांनी एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघाला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. किरण गाढवे यांनी केले. त्यांनी सांस्कृतिक विभागाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रा. अभिलाष जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक विभागाशी संबंधित विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. पूर्वाराणी जगताप यांनी आभार मानले, तर डॉ. सुवर्णा खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. विजेत्या संघाच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांना रंगभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच महाविद्यालयातील नवोदित कलाकारांना सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.
‘स्क्रिप्टशिवाय मी आज तुमच्यासमोर उभा आहे’ – मयूर गायके; पुरुषोत्तम करंडक विजेत्या संघाचे वाघिरे महाविद्यालयात अनुभवकथन









Leave a Review