वाघीरे महाविद्यालयात अविष्कार स्पर्धेच्या उद्बोधन वर्गाचे आयोजन

Share this Newz

सासवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे अविष्कार स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगीडॉ. प्रशांत साठे यांनी ‘अनुभव, ज्ञान आणि अविष्कार स्पर्धेचे विषय’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ. प्रशांत साठे यांनी अनुभव, निरीक्षण, ज्ञान आणि संशोधन यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधावेत. अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग संशोधन व नवकल्पनांच्या निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. अविष्कार स्पर्धा ही विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती विकसित करणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.
अविष्कार स्पर्धेसाठी विषय निवडताना त्यातील नावीन्य, सामाजिक उपयुक्तता, व्यवहार्यता आणि संशोधनाची शक्यता यांचा विचार करणे आवश्यक आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्रे, पर्यावरण, भाषा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक विषय निवडावेत, असे आवाहन त्यांनी केले.

प्रकल्प तयार करताना विषयाची निवड, उद्दिष्टे, माहिती संकलन, निरीक्षण, प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्ष यांना महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना कृतीची जोड देऊन समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारावेत, असेही डॉ. साठे यांनी सांगितले. संशोधनामध्ये मौलिकता, चिकित्सक विचार आणि शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. उद्बोधन वर्गात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यापीठ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या अविष्कार स्पर्धेचे महत्त्व व उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला, संशोधनवृत्तीला आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होऊन त्यांच्या संशोधनाला योग्य व्यासपीठ मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सेठ गोविंद सेठ साबळे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. एन. एस. गिरी, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. सचिनकुमार शहा आणि ए.आर.सी. समन्वयक डॉ. संदीप राठोड उपस्थित होते.

सूत्रसंचालन डॉ. विद्या पाटणकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. किशोर लिपारे यांनी मानले. या उद्बोधन वर्गास महाविद्यालयातील विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेतील विषय निवड, संशोधनाची दिशा आणि प्रकल्प सादरीकरणाबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.


Share this Newz