पुणे : सध्याच्या काळात माणूस अधिकाधिक स्वतःपुरता विचार करताना दिसतो. मात्र, बापूसाहेब कांबळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता समाजासाठी आयुष्य समर्पित केले आहे. समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती साधायची असेल, तर निःस्वार्थ भावनेने समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले.
महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बापूसाहेब कांबळे यांना डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या हस्ते ‘धम्मरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. माजी नगरसेविका लता राजगुरू, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती पुणे शहर पूर्व विभागाचे अध्यक्ष कुणाल राजगुरू, नगरसेवक अविनाश साळवे आणि विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना बापूसाहेब कांबळे म्हणाले, “धम्म म्हणजे लोकांचे दुःख जाणून घेणे आणि ते दूर करण्यासाठी अविरत प्रयत्न करणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या धम्ममार्गावरून मी वाटचाल करत आहे. समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही भावना कायम मनात असल्यामुळेच लहान मुले आणि महिलांसाठी काम करण्याची संधी मला मिळाली.”
महामाता रमाबाई आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकाच्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनी हा पुरस्कार मिळणे, हा केवळ माझाच नव्हे, तर माझ्यासोबत सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव आहे. सामाजिक काम करताना अनेक अडचणी आल्या; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आणि गौतम बुद्धांचा मार्ग यांमुळेच आपण कार्यरत राहू शकलो, अशी भावना कांबळे यांनी व्यक्त केली.
नगरसेवक अविनाश साळवे म्हणाले, “आज नालेसफाई किंवा ड्रेनेजचे झाकण बदलले तरी त्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला जातो. चौकाचौकांत प्रसिद्धीसाठी फ्लेक्स लावले जातात. मात्र, बापूसाहेब कांबळे गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी आपल्या कामाची जाहिरातबाजी कधीही केली नाही. यातूनच त्यांचा निःस्वार्थीपणा दिसून येतो. अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.”
माजी नगरसेविका लता राजगुरू म्हणाल्या, “बापूसाहेब कांबळे यांचे सामाजिक कार्य मी गेल्या अनेक वर्षांपासून जवळून पाहत आहे. त्यांनी केलेल्या कामामुळेच समाजाने त्यांच्यावर प्रेम केले आहे. हा पुरस्कार म्हणजे महामाता रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद तसेच जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम यांचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले, तर लता राजगुरू यांनी आभार मानले.









Leave a Review