The Newz Biz Team, Pune
जिल्ह्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सलेट केमिकल कंपनीला प्राथमिक माहितीनुसार शॉटसर्किट झाल्याने आग लागून ही कंपनी आगीत जळून खाक झाली आहे. गुरुवारी ( दि, १ ऑक्टोबर ) रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागल्याने कुरकुंभ, पांढरेवाडी, झगडेवाडी पुन्हा भयभीत झाली होती. संबंधित कंपनी वेगवेगळ्या मिश्रित केमिकलवर प्रक्रिया करून एकत्र असलेले केमिकल वेगळे करण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.
ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोटच्या लोट दिसत होते. यामध्ये कंपनीत असणारी काही चार चाकी वाहनेही जळून खाक झाली आहेत. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. पाण्याच्या पाच टँकरनी यावेळी अग्निशमन बंबाला पाणी पुरवण्याचे काम केले. या कंपनीतील संपूर्ण केमिकल संपेपर्यंत आग सुरू होती. यावेळी दौंड नगरपालिका, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल तसेच ऑनर लॅब कंपनी बारामती MIDC मधील बंब असे पाच ते सहा बंब यावेळी कार्यरत होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सदर कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, आम्ही घटनास्थळी आहोत तसेच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, आग आटोक्यात आली असून कोणीही घाबरू नये अशी माहिती पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या फोनच्या सहाय्याने सर्व परिसरातील नागरिकांना संपर्क साधून माहिती दिली.










Leave a Review