पिंपळे गुरव, ज्ञानेश्वर टकले : पिंपळे गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मध्ये ४३२ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या सात मजली अनधिकृत आरसीसी इमारतीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाने मंगळवारी कारवाई केली. दोन जेसीबीच्या सहाय्याने या इमारतीचे पाडकाम करण्यात आले. मात्र, याच पिंपळे गुरव परिसरात सुरू असलेल्या अन्य अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे बीट निरीक्षक, अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडून रेड कार्पेट टाकल्याची चर्चा चांगलीच रंगली असून, तेवढीच सडकून टीकाही केली जात आहे.
तब्बल सात मजली इमारत उभी राहते, तरीही तोपर्यंत बीट निरीक्षक, अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना ही आणि अशा बऱ्याच इमारती दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनधिकृत बांधकामांना सुरुवातीच्या टप्प्यातच आळा घालण्याऐवजी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते पाडण्याची कारवाई का केली जाते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या कारवाईनंतर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बीट निरीक्षकावर कारवाई, तरीही अनधिकृत बांधकामे सुरूच : ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पिंपळे गुरव भागातील बीट निरीक्षक उमेश अरुण लोंढे याला ११ जून रोजी तीन मजली अनधिकृत इमारत न पाडण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा उल्लेखही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. त्यामुळे परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाच्या देखरेखीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
* पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत बांधकामे जोमात : पिंपळे गुरव परिसरात आणखी काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा ठोस दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. यामध्ये लोकप्रतिनिधिंच्या अनधिकृत बांधकामाला बीट निरीक्षकासह महापालिका अधिकारी का अभय देत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ पाडकामापुरती कारवाई न करता बांधकाम सुरू होतानाच त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
* कारवाई झाली; पण जबाबदारी निश्चित होणार का? सात मजली इमारत उभी राहेपर्यंत प्रशासनाच्या कोणकोणत्या स्तरावर देखरेख झाली, संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामाची माहिती कधी मिळाली आणि कारवाईला एवढा वेळ का लागला, याची चौकशी होणार का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.









Leave a Review