राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता कोकणे; तर पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पल्लवी पांढरे

Share this Newz

The Newz Biz Team, Pimpri

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या संघटना पुर्नबांधणीस सुरुवात करण्यात आली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी संगीता कोकणे यांची, तर पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पल्लवी पांढरे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

महिला संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, नगरसेविका वैशाली काळभोर यांनी पिंपरी व चिंचवड विधानसभा अध्यक्षासह सपना घाडगे (उपाध्यक्षा, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस), रूपाली भंगाळे (उपाध्यक्षा, चिंचवड विधानसभा) , अर्चना राऊत (उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाा महिला राष्ट्रवादी काँग्रेस), भारती कदम (उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस) या महिलांच्या नियुक्त करून महिला संघटन मजबूत केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, संगीता ताम्हाणे, प्रज्ञा खानोलकर, सुलक्षणा धर, प्रवक्ते फजल शेख, मनीषा गटकळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना रूपाली चाकणकर यांनी सांगितले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट झाला असून,  उद्योगधंद्यांचेही मजबूत जाळे उभे राहिले आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. आशिया खंडात पिंपरी-चिंचवडची ओळख उद्योगनगरी म्हणून आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात उद्योगधंद्यांची वाताहत सुरू आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराला राष्ट्रवादी काँग्रेसने बेस्ट सिटी बनवले होते. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आपले शहर वेस्ट सिटी बनवली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन पक्षसंघटन मजबूत करावे, असे आवाहनही  रुपाली चाकणकर यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

संजोग वाघेरे म्हणाले, की उत्तर प्रदेश भाजपच्या योगी सरकारची दडपशाही देशातील सामान्य नागरिक कधीही खपवून घेणार नाही. हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्यांना अटक करण्यात आली, ही भाजपची दडपशाही चालणार नाही.


Share this Newz