कोरोना विषाणू मानवनिर्मितच ? ‘या’ शास्त्रज्ञाकडे आहे पुरावा

चीनच्याच प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यांचा दावा
Share this Newz

बीजिंग : चीननेच कोरोनाचा विषाणू तयार केला असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. याला पुष्टी देणारे वक्तव्य चीनच्याच प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. ली-मेंग यांनी केले आहे. हा विषाणू मानवनिर्मितच असून, आपण लवकरच याबद्दल पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण लवकरच एक अहवाल प्रसिद्ध करणार असून, कोरोनाचा विषाणू हा मानवनिर्मित असल्याचा पुरावा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. ली-मेंग यांनी चीन सोडले असून, अमेरिकेत आश्रय घेतला आहे. डॉ. ली- मेंग यांनी सांगितले, की कोरोनाचा फैलाव झाला नव्हता, त्यापूर्वीच चीन सरकारला याबाबतची माहिती मिळाली होती. चीन सरकारने आपल्याबाबतची सर्वच माहिती मिटवून टाकली आहे, असे त्यांनी सांगितले. वुहानच्या बाजारातून करोनाचा फैलाव झाला असल्याच्या बातम्या या दिशाभूल करणाऱ्या आहेत.

याबाबत बोलताना डॉ. यान यांनी सांगितले की, वुहानचा मांस बाजार हा एखाद्या पडद्यासारखा वापरण्यात आला आहे. या पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. हा विषाणू नैसर्गिक नाही. वुहानच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर आला असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, जीनोमचा सिक्वेन्स हा माणसाच्या बोटांच्या ठश्यासारखा आहे. या आधारावर त्याची ओळख पटवता येऊ शकते. भक्कम पुराव्याच्या आधारे हा विषाणू प्रयोगशाळेतून आला असल्याचे सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉ. यान यांनी सांगितले की, याबाबतची माहिती चीनच्या सरकारी डेटाबेसमधून हटवण्यात आली आहे. सहकाऱ्यांना माझ्याविरोधात अफवा पसरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या काही मोजक्या काही शास्त्रज्ञांपैकी आपण एक असल्याचेही त्यांनी म्हटले. चीन सरकार आपल्या जीवावर उठले असून, हाँगकाँगमधून अमेरिकेत स्थलांतरीत झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मात्र, चीन सरकारने कोरोना विषाणू वुहान येथील प्रयोगशाळेत बनवला असल्याचा आरोप याआधीदेखील अनेकदा फेटाळून लावला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावासमोर झुकत चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या चौकशी पथकाला चौकशी करण्यासाठी चीनमध्ये प्रवेश दिला. वुहान प्रयोगशाळेच्या संचालकांनीही करोना विषाणू प्रयोगशाळेत निर्मित झाला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, आता शास्त्रज्ञांनी सविस्तर अहवाल सादर केल्यानंतरच याबाबतचे तथ्य समोर येईल.

Share this Newz