10 वी, 12 वी नंतर ‘करियर’बाबत काय विचार करताय ?

मोनिका शिंगाडे, संपादक, TheNewzBiz
Share this Newz

दहावी-बारावी पायरीवर चुकीची निवड झाली, की करीयरमधील महत्त्वाची वर्षे वाया जाण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. 

करिअरच्या दृष्टीने दहावी आणि बारावी हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे बारावीपेक्षा दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना निर्णय घेणे कठीण असते. कारण नेमकं कला, विज्ञान, वाणिज्य शाखा निवडायची किंवा आयटीआय करायचे की पॉलिटेक्निक करायचे, अशा त्रेधा मानसिकतेत विद्यार्थी, पालक असतात.  अर्थात तुमची आवड आणि क्षमता याचा विचार निर्णय घेताना केला जात असेल, तरच हा प्रश्न उद्भवतो. अन्यथा मिळालेल्या गुणांवरून कोणती शाखा निवडायची हे पालकांनी ठरवण्याची पद्धतही आहेच. तिथे आवडी निवडीचा विचार केला जात नाही. पण अशा प्रकारे करीयरची दिशा ठरलेले किती टक्के विद्यार्थी यशस्वी होत असतील, हा मोठा प्रश्न आहे. करिअरच्या प्रांगणात आपले पाऊल टाकताना आपली आवड-निवड अन् आपल्या पालकांची आर्थिक परिस्थिती याचा विचार होणे अपेक्षित आहे.

दहावीनंतर उपलब्ध असणाऱ्या शाखांबद्दल विचार करूयात… 

  •  विज्ञान शाखा 

अधिकाधिक पालकांची इच्छा असते की आपल्या पाल्याने विज्ञान शाखाच निवडावी. कारण यानंतर डॉक्टर, इंजिनियर असे प्रतिष्ठित समजले जाणारे मार्ग निवडता येतात. शिवाय याचा अजून एक फायदा असा असतो, की तुम्ही दहावी बारावी विज्ञान शाखेतून केले आणि तुम्हाला वाटले की या शाखेतून करियर करायला नको तरीही फारसे काही अडत नाही. कारण बारावीनंतर तुम्हाला वाणिज्य आणि कला शाखा निवडण्याचा पर्याय खुला असतो. याउलट वाणिज्य आणि कला शाखेत ही मुभा नसते. बऱ्याचदा पालकांचा आग्रह असतो, की विज्ञानच शाखा निवडावी. विद्यार्थी सुद्धा सुरक्षित बाजू म्हणून असा विचार करतात. ज्यांना या क्षेत्रांत काम करण्याची इच्छा आहे त्यांनी ही शाखा निवडावीच. पण फक्त पालकांच्या इच्छेखातर वा सेफ साइड म्हणून असा निर्णय घेणाऱ्यांनी यातील अडचणींचाही विचार करायला हवा. ही शाखा जरा कठीण मानली जाते. आवड नसतानाही ती निवडून जर तुम्हाला तो अभ्यासक्रम जमला नाही, तर वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय बारावीनंतर पुन्हा वेगळी शाखा घ्यायची म्हणजे अभ्यासक्रमात होणारा मोठा बदल आपल्याला स्वीकारता येणार आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. आणि हा सगळा गोंधळ वाढवण्यापेक्षा आपल्याला ज्यात रस आहे ते निवडणे कधीही चांगले.

१२ वी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात, त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात.  १२ वी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. संगणक पदवी शिक्षणात सध्या अनेक विधिध संधी उपलब्ध आहेत.

  • वाणिज्य शाखा 

वाणिज्य शाखेत आर्थिक व्यवहारांशी  निगडीत संपूर्ण अभ्यासक्रम असतो. त्यामुळे इथे काटेकोरपणा आणि अचूकतेला खूप महत्त्व असते. म्हणूनच विज्ञान नाही मिळाले, तर वाणिज्य निवडू असा विचार करणे एकदम चुकीचे आहे. या शाखेसाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यात आहेत का आणि यानंतर ज्या प्रकारची नोकरी असेल ती करणे त्याला जमणार आहे का, याचाही विचार करायला हवा. कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता उत्तम वातावरण आहे.

  • कला शाखा

काहीच पर्याय नाही, म्हणून कला शाखेतील सर्व पर्यायांची फारशी माहितीच घेतली जात नाही. वस्तुस्थिती बघितली तर करिअर करण्यासाठी सर्वोत्तम म्हणून कला शाखा विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरत आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि अशा अनेक विषयात याद्वारे पदवी घेता येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर कला शाखा हा उत्तम पर्याय आहे. शिवाय ऍनिमेशन, डिझाईन, अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रिएटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग उपलब्ध होतात. भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे.

याशिवाय १२ वीनंतर विद्यार्थी विधी (Law) शाखेकडे वळू शकतो, विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर आहेच.

कला शाखेत प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांना अगदी अकरावीपासूनच आपल्या कला गुणांना वाव देण्याची संधी मिळते. मग गॅदरींग, साहित्य मंडळ, निवडणूका, नाटय स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा अनेक पातळीवर आपण आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून देऊ शकतो.

गत काही वर्षात अडगळीत पडते की काय, अशी वाटणारी कला शाखा गत दोन वर्षात तेजीत आहे. यंदा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज, एस.पी. कॉलेज, वाडिया कॉलेजमधील ऍडमिशनची यंदाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांनी कला शाखेला पसंती दिल्याचे दिसते. विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेचा कट ऑफ जास्त लागला आहे. म्हणजे 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या हुशार विद्यार्थ्यांचा कला शाखेकडे कल असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, छंद जोपासत शिक्षण घेता येते हा फायदा ही शाखा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो.

  • आयटीआय / डिप्लोमा कोर्सेस

दहावीनंतर अकरावी बारावी न करता  विविध व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध आहेत. आयटीआय हा एक चांगला पर्याय आहे. आज अनेक कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही. कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे काम आयटीआय करते. किंवा आयटीआय नंतर स्वतःचा व्यवसायही सुरू करून लवकर स्वतःच्या पायावर उभे राहता येते.  याबरोबरच पॉलिटेक्निक डिप्लोमा हा पर्यायही उपलब्ध आहे. डिप्लोमानंतर तुम्ही ज्या विषयात डिप्लोमा केला त्याच्या पदवीलाही प्रवेश घेता येतो. पण डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला नक्की कशात करियर करायचे हे नक्की असावे लागते. याचा एक फायदा असा की जर तुमची दिशा नक्की असेल, तर इतर विषयांचा अभ्यास न करता तुम्हाला फक्त आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

  • पोलीस, सैन्य दलात संधी

१० आणि १२ वीनंतर विद्यार्थ्यांना पोलीस दलातील हवालदार या पदाकरिता भरती होता येते. याकरिता शारीरिक चाचणी परीक्षा, तोंडी अन् लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते. तर सैन्यदलातील अनेक पदांकरिताही विद्यार्थी १०, १२ वीच्या मार्कावर अर्ज करू शकतात. १२ वीनंतर सैन्यदलातील मर्चंट, नेव्ही, एअर फोर्स असे पर्याय निवडता येतात. म्हणजेच पुढील शिक्षण अन् करिअर असे पर्याय आहेत.

  • उद्योजक बनून इतरांना काम द्या

करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. मनात कायम जिज्ञासा ठेवली, झोकून काम केले, चिकाटी, प्रामाणिकता, गणिती वृत्ती ठेवली, तर व्यवसायातही यश मिळू शकते. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि व्यवहारी वृत्ती ठेवली पाहिजे. तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने शासनाने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले. मात्र, शासकीय तसेच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करतात, स्वतः उद्योग सुरू करून इतरांना नोकरी देत नाहीत, त्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे फक्त नोकरी हे ध्येय न ठेवता चांगला उद्योग करून चार लोकांना आपण रोजगार देऊयात, हा विचार मनात बाळगणे आवश्यक आहे.

  • काही धोके

दहावीनंतर डॉक्टर वा इंजिनीयर होण्याची स्वप्ने पाहणारे विद्यार्थी शक्यतो सायन्सला अ‍ॅडमिशन घेतात. पण ११,१२ वीच्या वर्गात सायन्सचे विषय अनुक्रमे, भौतिक, रसायन शास्त्र अन् गणित या ग्रुपमध्ये त्यांची गुणोत्तर टक्केवारी काहीशी खालावते, तसेच सीईटी अन् नीट परीक्षेतही गुणांकन खालावते, साहजिकच १२ वीच्या मार्कावर परिणाम होतो अन् अपेक्षित ट्रॅकला प्रवेश मिळत नाही, अशावेळी मग मुले १० वीच्या मार्कावर डिप्लोमाला प्रवेश अर्ज भरतात, या सर्वामध्ये दोन वर्षे वाया जातात, काहीवेळा विद्यार्थी ठरलेला ट्रॅक सोडून कॉमर्स वा कला शाखेकडे वळतात, मात्र मुळातच ही त्यांची आवड नसल्याने ते या शिक्षणात रमू शकत नाहीत, त्यामुळे या निर्णयाचा फटका आयुष्यातल्या गंभीर घटनांत बदलणारा ठरतो. त्यामुळे एकतर आपल्याला काय अन् कितपत झेपेल याचा विचार करूनच विद्यार्थी आणि पालकांनी साईट निवडावी. समजा अपयश वा कमी मार्कस पडले तर कोणता पर्याय निवडायचा ते आधीच ठरवावे, म्हणजे नैराश्य येणार नाही.

ही झाली शाखांबाद्दलची माहिती. परंतु या शाखा निवडताना इतरही काही गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

Advertisement
Advertisement

१. आवड आणि इच्छा

तुम्ही जी दिशा निवडता त्यात तुम्हाला पुढील आयुष्यभर काम करायचे असते. त्यामुळे त्यातून किती पैसा कमावता येऊ शकतो एवढाच विचार न करता आपण हे काम एवढ्या मोठ्या कालावधीसाठी करू शकू का? हे पाहिले पाहिजे. आपल्या विषय आणि अभ्यासाबद्दलच्या आवडी निवडी जाणून घ्या. त्या माहिती नसल्यास वेळ घेऊन आपल्याला नक्की काय आवडते ते ठरवा. कारण आपल्याला आवडणाऱ्या विषयात काम करण्याचा सहसा कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करियर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते. शिवाय आवड असल्याने त्यात प्रगती करणेही अवघड वाटत नाही.

२. व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास

जर आपण स्वतच्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेतले तर करियर निवडणे अधिक सोपे होते. कारण त्याने आपण कुठे कमकुवत आहोत कुठे कमी पडतो हे कळते व त्यावर अधिक लक्ष देता येते. शिवाय काय सहज जमते, आपल्यात काय कौशल्ये आहेत याचीही जाणीव होते. मग अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला कोणता अभ्यासक्रम आणि कसे करियर अधिक उत्तम ठरेल याचा अंदाज करणे तितकेसे कठीण नसते.

३. अनुभवी लोकांशी चर्चा

ज्या विषयात आपल्याला रस आहे, त्यात पूर्वी करियर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे ठरते. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक, शिक्षक, मोठे बहीण-भाऊ यांनाही तुम्ही तुमच्या शंका सांगायला हव्यात. त्याने उत्तरे तर मिळतातच, पण नवीन माहितीही मिळते. या लोकांना बऱ्याचदा तुमच्याबद्दल अशा गोष्टी माहिती असतात, ज्याची तुम्हालाही कल्पना नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात.

४. करियर कौन्सिलर

जेव्हा बराच विचार करूनही नक्की काय करावे सूचत नाही, तेव्हा करियर कौन्सिलरकडे जाणे हा उत्तम पर्याय आहे. किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तरीही हा पर्याय असतो. कारण कौन्सिलर अशा काही चाचण्या घेतात… ज्याने तुमचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे कळते. तुमचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारच्या करियरसाठी योग्य आहे हे ही त्यातून कळते. शिवाय त्यांना सगळ्या शाखांबद्दल आणि संधींबद्दल ज्ञान असते. त्यामुळे ते तुमची मोठी मदत करू शकतात.

५. निर्णयक्षमता

तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय मार्ग निवडतेय, याचाही विचार करु नका. स्वतच्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वत: घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हाला काय करायचे, हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा. थोडक्यात काय तर हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी असल्याने तो पूर्णपणे अभ्यास करून घ्यायला हवा. त्यात पर्यायांचा अभ्यास तर कराच पण स्वतःचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. एकदा का तो केला की कामाला लागा. मग तुमचे ध्येय गाठण्यापासून कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

 -धन्यवाद-

Advertisement
Advertisement

 

Advertisement

Share this Newz