पतंजली ब्रँडही आयपीएल प्रयोजकत्वाच्या शर्यतीत

Share this Newz

दिल्ली :

भारत आणि चीन यांच्यातील तणावजन्य परिस्थितीमुळे बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी व्हिवो कंपनी बरोबरचा करार स्थगित करावा लागला. चिनी कंपनीसोबतचा करार मोडावा यासाठी बीसीसीआयवर भारतीय चाहत्यांकडून दबाव वाढत होता. तेराव्या हंगामासाठी बीसीसीआय सध्या नवीन प्रायोजकत्व शोधण्याच्या तयारीत आहे.

तेराव्या हंगामाला Jio, Byju’s, Amazon, Coca Cola हे ब्रँड प्रायोजकत्व देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात खासगी वृत्तसंस्थेने वृत्त दिले.

“पतंजली हा बँड जागतिक पातळीवर पोहचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला प्रायोजकत्व देता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.” पतंजली उद्योगसमूहाचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनी संबंधित वृत्तपत्राला माहिती दिली. यासाठी पतंजली लवकरच आपली निवीदा दाखल करणार असल्याचे समजते. बऱ्याच तज्ज्ञांच्या मते,” सध्याच्या घडीला देशात चीनविरोधी वातावरण असताना पतंजलीने आयपीएलला स्पॉन्सरशिप देणं याने देशात त्यांच्या ब्रँडला मोठा फायदा होऊ शकतो.”

व्हिवो बरोबरचा करार स्थगित केला असला याचा अर्थ बीसीसीआयवर कोणतेही आर्थिक संकट आले नाही. बीसीसीआय प्रत्येकवेळी दुसरा पर्याय तयार ठेवते. आतापर्यंत सर्व खेळाडू, राज्य संघटना आणि अधिकारी यांच्या सहकार्याने बीसीसीआयचे कामकाज हे चांगले चालले आहे. त्यामुळे एखाद्या वर्षी जरी काही अडचण आली तरीही त्याचा फारसा परिणाम होत नाही. प्रत्येक नावाजलेल्या ब्रँडकडे असा दुसरा पर्याय असतोच.” असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने याने एका खासगी कार्यक्रमात सांगितले.


Share this Newz