‘स्टार्टअप सक्सेस जर्नी’तून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे धडे ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आयबीएमआर यांचा संयुक्त उपक्रम

Share this Newz

पिंपरी, दि. ०२ नोव्हेंबर २०२६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड एंटरप्राइज (सीआयमायई) व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पूना संचालित इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयबीएमआर), वाकड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्ट-अप टॉक सिरीज २.०’ अंतर्गत ‘स्टार्टअप सक्सेस जर्नी : फ्रॉम आयडिया, इनोव्हेशन टू इम्पॅक्ट’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथील स्टार्टअप, इनक्युबेशन अँड इनोव्हेशन विभागाचे प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे उपस्थित होते.

या व्याख्यान सत्रात प्रा. डांगरे यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप म्हणजे काय, त्याची मूळ संकल्पना, एका छोट्या कल्पनेतून मोठा व्यवसाय कसा उभा राहतो, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नावीन्यपूर्ण कल्पनांचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर कसे करावे, नवीन उद्योगाची उभारणी करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, व्यवसायाचा विस्तार कसा करावा आणि दीर्घकाळ यश टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या व्यावसायिक रणनीती आवश्यक असतात, याबाबत त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योजक बनण्याची मानसिकता कशी ठेवावी, यावरही त्यांनी भर दिला. या सत्रामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या विविध संधी, नवकल्पनांचे महत्त्व आणि यशस्वी स्टार्टअप उभारण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, नेतृत्वगुण आणि जोखीम पत्करण्याची क्षमता याविषयी मोलाची माहिती मिळाली.

या कार्यक्रमाला एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रश्नोत्तरे केली. या कार्यक्रमाप्रसंगी आयबीएमआरचे प्रभारी संचालक डॉ. सचिन मिसाळ यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.


Share this Newz