तळेगाव दाभाडे : औषधांचा सुरक्षित व योग्य वापर, रुग्णसेवेतील फार्मासिस्टचे महत्त्व तसेच वाढती प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (Antimicrobial Resistance – AMR) या गंभीर समस्येबाबत समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली आणि इंद्रायणी विद्या मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र व मुंबई विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार ४ नोव्हेंबर रोजी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे होणार आहे.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेच्या नियमक मंडळाच्या वतीने कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार सौ. निरुपा कानिटकर, राज्य समन्वयक प्रा.प्रवीण जावळे यांसह प्रा.डॉ.संजय आरोटे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था १९६५ सालापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. संस्थेतील विद्यार्थी शैक्षणिक, क्रीडा व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवत असतानाच सामाजिक संवेदनशीलतेची बीजे रुजविण्याचे कामही संस्था सातत्याने करीत आहे. फार्मसी सप्ताह हा त्याच सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरोधात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येणार आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. मोंटुकुमार पटेल, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे आणि खजिनदार निरुपमा कानिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे तसेच अपूर्ण औषधोपचार यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्यविषयक समस्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा रॅलीचा मुख्य उद्देश आहे.
फार्मसी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साय-टून (Sci-Toon), पोस्टर सादरीकरण, प्रश्नमंजुषा, माहितीपत्रक, पथनाट्य आणि रील मेकिंग अशा सहा स्पर्धांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या माध्यमातून औषधांचा योग्य वापर, प्रतिजैविक प्रतिकारशक्ती, रुग्ण समुपदेशन आणि सार्वजनिक आरोग्य या विषयांवर विद्यार्थ्यांना आपले विचार सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रतिजैविक प्रतिकारशक्ती या विषयावर आयोजित करण्यात आलेला तज्ज्ञ परिसंवाद. यामध्ये ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकारे, के. एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबईच्या प्राचार्या प्रा. मंजिरी घरत, PCI सदस्य डॉ. संजय तोष्णीवाल,
ऑरगॅनीक्स बायोकेम प्रा. लि.चे संचालक डॉ. सुहित गिल्डा, डॉ. बी. एस. कुचेकर आणि डॉ. सथियानारायणन हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
या राज्यस्तरीय कार्यक्रमाला PCI सदस्य डॉ. श्रीकांत जोशी, जगन्नाथ शिंदे, डॉ. संजय तोष्णीवाल, प्रकाश वंजारी आणि डॉ. शिवानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया सदस्य विजय पाटील हे कार्यक्रमाचे निमंत्रक असून, नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्य समन्वयक प्रा. प्रवीण जावळे, डॉ. विक्रम शिंदे आणि प्राचार्य डॉ. संजय आरोठे हेही नियोजनात सहभागी आहेत.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आणि कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई विभागातील डी. फार्म., बी. फार्म., एम. फार्म. आणि फार्म. डी. अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, फार्मासिस्ट तसेच औषधनिर्माण क्षेत्रातील दोन हजारांहून अधिक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
औषधांचा योग्य वापर, प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविषयी जनजागृती आणि सक्षम फार्मासिस्टच्या माध्यमातून निरोगी समाजाची निर्मिती हा या राज्यस्तरीय उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. फार्मासिस्टची रुग्णसेवेतील भूमिका अधोरेखित करण्यासोबतच भविष्यातील आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सज्ज करणे, हा या आयोजनामागील महत्त्वपूर्ण हेतू आहे.









Leave a Review