पिंपळे गुरव : पिंपळे गुरवमध्ये सालाबादप्रमाणे यंदाही नगरसेवक शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना गोडधोड खाऊ घालून रामकृष्ण मंगल कार्यालय चौक ते पिंपळे गुरव गावठाण दरम्यान बैलांची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
शुक्रवारी सकाळपासूनच शामभाऊ जगताप परिवारांची बैलपोळा सण साजरा करण्याकरिता लगबग सुरू होती. बैलांना स्नान घालून, बाशिंग बांधून, फुगे, मणी-माळ, रंगरंगोटी, आदी पारंपारिक बैलांना साज घालून सजवून तयार होते. सायंकाळी सहाच्या सुमारास शामभाऊ जगताप यांची दोन्ही बैल मिरवणुकीसाठी घुंगराचा आवाज करीत डौलाने रस्त्यावर येताच एकच जल्लोष झाला. यावेळी पारंपरिक शिस्तबद्ध बँड, हलगी या वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पिंपळे गुरवकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बैलांचे जागोजागी, चौकाचौकात पूजन करण्यात आले.
मिरवणुकीत गावातील जगताप, कदम, जांभुळकर, नवले, कवडे, काशिद, देवकर, सांळुके, चव्हाण आदी समस्त ग्रामस्थ, मित्र परिवारासह मोठ्या संख्येने मिरवणूकीत सहभागी झाले होते.
परंपरा, चालीरीतीनुसार लाडक्या बैलांची सजावट, पूजा आणि पुरणपोळीचा नैवद्य खाऊ घालून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलांच्या ऋणात राहण्यासाठी हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलजोडीची खांदामळणी केली व बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पिंपळे गुरवमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. – शामभाऊ जगताप, नगरसेवक, भाजप











Leave a Review