द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील मॉडेल स्किल सेंटर, विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रोजगार कौशल्य योजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, समन्वयक नरसिंग गिरी, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी विजय घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांनी स्मार्ट सिटी योजना सविस्तर स्पष्ट करत याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा विशद केला. त्याचबरोबर या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारे इनक्युबेशन सेंटर, एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट योजना व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध विविध ४२ अभ्यासक्रमांची माहिती दिली.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सदर रोजगार कौशल्य योजना कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांचे अनुभवाचे बोल ऐकत नवीन शिकण्याची संधी आहे, असे नमूद करत विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळणे ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर विद्यापीठ व महाविद्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध व्हॅल्यू अॅडेड कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागतो असे मत नोंदवत या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थी अधिक सक्रिय बनतील असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये मार्गदर्शन करत असताना एमसीईडी नवी मुंबईचे विभागीय अधिकारी सुरेश उमाप यांनी विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळत यशस्वी उद्योजकता संबंधित पुस्तकांचे वाचन करणे, उद्योजकांना भेटणे, प्रदर्शन पाहणे, प्रशिक्षण घेणे या सूत्रांचा अवलंब करावा असे नमूद करत किर्लोस्कर, विठ्ठल कामत, बाबा कल्याणी अशा विविध नावाजलेल्या उद्योजकांच्या जीवनाची कहाणी विद्यार्थ्यांसमोर सादर केली.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रामध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रातील शिक्षिका व उद्योजक प्राजक्ता जोशी यांनी ‘एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी’ या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करत बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवत तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार केला पाहिजे असे सांगितले. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बदललेल्या व्यवसायाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधत असताना अंतराळ पर्यटनाचे उत्तम उदाहरण दिले. त्याचबरोबर सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेल्या भारत देशांमधील कुशल मनुष्यबळाची निकड व वाढती मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांनी त्यानुसार स्वतःला घडवायच्या महत्त्वपूर्ण टिप्स उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.
‘बी यूवर बॉस’ या तिसर्या व अंतिम सत्रामध्ये उद्योजक संसद चिंचवडचे संस्थापक अक्षय सरोदे यांनी अपघातामुळे शारीरिक मर्यादा असतानादेखील व्हीलचेअरद्वारे आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वाने विद्यार्थ्यांना सुरवातीपासूनच करिअरची योग्य दिशा मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करत जागतिक स्तरावर स्पर्धा करत असताना स्वतःला कसे विकसित करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रकाश पांगारे, डॉ. क्रांती बोरावके, डॉ. अमृता इनामदार, प्रा. संतोष सास्तुरकर, डॉ. सविता वासुंडे, डॉ. दिपाली चिंचवडे, डॉ. मनीषा त्र्यंबके, प्रा. अरबाज सय्यद, प्रा. रोहिणी येवले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







Leave a Review