घोलप महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

मूलभूत विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना परिपुर्ण माहिती व्हावी, या उद्देशाने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये विज्ञान असोसिएशनतर्फे विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देणार्‍या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करत राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, विज्ञान असोसिएशन समन्वयक डॉ. विजय घाडगे उपस्थित होते.

सर्वप्रथम सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्य व संशोधनाचे स्मरण करण्यात आले.
उपक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विज्ञान असोसिएशनचे समन्वयक डॉ. विजय घाडगे यांनी विद्यार्थ्यांनी शाश्वत विकासाची कास धरत असताना अष्टपैलू व्यक्तिमत्व अंगीकारत नेहमी नवीन शिकण्याचे ध्येय ठेवले पाहिजे असे नमुद करत सी. व्ही. रमण यांचा जीवनपट थोडक्यात उलगडला.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विज्ञान दिनानिमित्त मुलभूत विज्ञानातील भविष्यातील विविध संधींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्यामधील कल्पकतेला चालना मिळावी या उद्देशाने आयोजित उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच मुलभूत विज्ञानाकडे विद्यार्थ्यांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असे मत व्यक्त करत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयसर, राष्ट्रीय विज्ञान संस्था इत्यादी मुलभूत विज्ञानातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थामध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण घेता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महालिद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार्‍या व्हर्च्युअल लॅब सारख्या अत्याधुनिक सुविधांवर भाष्य करत संशोधनात्मक अभ्यासावर भर देत विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक कमवावा, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

भौतिक शास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनामध्ये रमण इफेक्ट या विषयावर आयोजित पोस्टर प्रेंझेटेशन स्पर्धेमध्ये विज्ञान विभागातील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच संगीता मधून विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी सायन्स अँड म्युझिक फ्युजन या कल्पक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत स्टार्ट अप प्रोजेक्ट इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मध्ये प्रोजेक्ट निवड झाल्याबद्दल मेघना खरवंडे तर इन्सापरय फेलोशिप शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल सायली सालवलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अश्विनी शेवाळे तर आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले.
सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. सतीश एकार, प्रा. अनंत पवार, डॉ. चंदा हासे, डॉ. वैशाली बन्सोड, डॉ. सीमा चौहान यांच्यासह विज्ञान विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz