राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षांची गाडी अडकली चेंबरमध्ये; निकृष्ट कामाबद्दल प्रशांत शितोळेंची तीव्र नाराजी

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

सांगवी, पिंपळे गुरव परिसरात सुरू असलेल्या अर्धवट विकासकामांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चुकीच्या पद्धतीची कामे उघडी पडली आहेत. नवी सांगवीतील फेमस चौक ते साई चौक या रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेल्या चुकीच्या चेंबरच्या कामाचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांना बसला असून,  त्यांची गाडी या रस्त्यावरील चेंबरमध्ये अडकली होती. या कामाबद्दल प्रशांत शितोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. चुकीच्या व संथगतीने सुरू असलेल्या कामांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे.

– प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड.

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अर्धवट रस्ते विकासकामांचा नागरिकांना रहदारीसाठी त्रास सहन करावा लागला. परिसरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची अर्धवट कामे रखडलेली आहेत. काही भागातील रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. ‌तर काही गेली तीन वर्षांपासून अद्यापपर्यंत कासवगतीने सुरू आहेत. आधी कोरोना लॉकडाऊनमधे बंद पडलेली कामे या हंगामात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामात अनेकदा नियोजनशून्यता, कामातील चुकांची वारंवार दुरूस्त्या व त्यात गेलेला वेळ यामुळे नागरिकांना उन्हाळा, पावसाळा व सध्या हिवाळ्यात पडणा-या पावसामुळे रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सांगवी येथील फेमस चौक ते साई चौक या रस्त्यावरील नव्याने करण्यात आलेल्या चेंबरच्या चुकीच्या कामामुळे पावसात वाहतूकीचा बोजवारा उडाला. स्थानिक माजी नगरसेवक व शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांची गाडी या रस्त्यावरील चेंबरमध्ये अडकली होती.

सर्वत्र पाणी साठलेले पाहायला मिळत आहे. वर्दळीच्या रस्त्यावर तुरळक वाहतूक पाहायला मिळत होती‌. चाकरमानी मंडळी, भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. एरव्ही गजबजलेल्या बाजारपेठेमधूनही शुकशुकाट पाहायला मिळत होता. हिवाळ्यात पावसाळ्यामुळे वातावरण गारठल्याने बहुतांश छोटे व्यावसायिकांनी घरी राहणे पसंत केले. खाऊ गल्ल्यांमधील चौपाट्याही ओस पडल्याचे चित्र सर्वत्र होते‌‌. संततधार पावसामुळे रस्त्यावरून पाणी वहात होते. अनेक ठिकाणी सखल भागात रस्त्यावर पाणी साचले.


Share this Newz