द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्लॉगेथॉन मोहिमेत सांगवी परिसरातील अबाल वृद्धांनी सहभाग नोंदवत मोहीम यशस्वी केली. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सर्वांचे आभार मानले.
सांगवी येथील पीडब्लूडी पाण्याच्या टाकी जवळील चौकात झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी ही चळवळ निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास महापौर ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, शिक्षण समितीच्या सभापती माधवी राजापूरे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
पिंपळे सौदागरमधील कोकणे चौक ते शिवराज नगर दरम्यान राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत स्विकृत नगरसेवक संदिप नखाते, सामाजिक कार्यकर्ते अरूण चाबुकस्वार, ड प्रभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, नागरीक सहभागी झाले होते.
मनसेच्यावतीने जुनी सांगवीतील छावा चौक ते दत्त मंदिर व चंद्रमणीनगर ते दापोडी पूल या दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सांगवीतील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, बचत गटांतील महिला व नागरिक सहभागी झाले होते, असे मनसेचे उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगितले.











Leave a Review