प्लागोथॉन स्वच्छता मोहिमेमध्ये घोलप महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेविषयी जनजागृती करिता आयोजित ‘प्लागोथॉन २०२१ – चला स्वच्छाग्रही बनुया’ मोहिमेमध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य संतोष ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र राजपूत, शिक्षण विभाग प्रमुख माधवी राजापुरे आदी उपस्थित होते.

मोहिमेच्या सुरुवातीला महापौर माई ढोरे यांनी नेहमी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहत विद्यार्थिदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण करत असल्याबद्दल बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच सदर मोहिमेची संकल्पना स्पष्ट करत स्वच्छतेचे महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक विभागात किमान दोन किलोमीटर अंतराचा मार्ग ठरवून त्या प्रत्येक मार्गावरुन चालताना रस्त्यावरील प्लास्टिक व इतर कचरा संकलन करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेंतर्गत ठरवण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी नवी सांगवी परिसरातील पाण्याची टाकी ते शनि मंदिरापर्यंतचा मार्ग ठरवत रस्त्यावर टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वस्तू तसेच इतर कचरा गोळा करत स्वच्छता केली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केलेले उत्कृष्ट कार्य तसेच स्वच्छते विषयी सादर केलेल्या पथनाट्याबद्दल उपस्थित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक व अधिकाऱ्यांनी स्वंयसेवकांचे कौतुक केले.

या मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, डॉ. मनीषा शेवाळे, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी जाधव, दिनेश भगत, ओमकार काजोळकर, नामदेव वरवंटकर यांच्यासह सुमारे ११० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.


Share this Newz