द न्यूज बिज् टीम, पुणे :
कोरोना काळामध्ये महाविद्यालय बंद असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये आघाडीवर राहिलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणाली समितीच्या सदस्यांना लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीममधील नवीन वैशिष्ट्यांची माहिती व्हावी या उद्देशाने एक दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे तंत्रस्नेही प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, समन्वयक लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक करत असताना ऑनलाइन शिक्षण प्रणाली समन्वयक लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांनी एल.एम.एस. अॅडमीनसाठी आयोजित या कार्यशाळेचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण सहज उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या वर्षभरामध्ये राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम ऑनलाइन शिक्षण प्रणाली मधील सदस्यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थी केंद्रीत उपाययोजना करत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे, असे नमूद करत ॲानलाईन शिक्षणप्रक्रिये विषयी इत्यंभुत माहिती दिली. तसेच ऑनलाइन शिक्षणामध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या ई – कन्टेन्ट निर्मितीमध्ये महाविद्यालयाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीचा आढावा घेत भविष्यामधील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची निकड लक्षात घेता माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून महाविद्यालयामध्ये दिल्या जात असलेल्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (LMS), मुडल, आय.सी.टी. क्लास रूम इत्यादी दर्जेदार सुविधांवर भाष्य केले.
या कार्यशाळेमध्ये संगणक शास्त्र विभागप्रमुख डॉ. सीमा चौहान यांनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एल.एम.एस) विषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर विभागातील प्रा. प्रीती भारंबे व प्रा. मंजूषा पाटील यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणाली मधील विविध घटकांविषयी विशेषतः ॲडमीन साठी असणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल माहिती देत उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
या प्रशिक्षण सत्रासाठी महाविद्यालयामधील ऑनलाइन शिक्षण समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.









Leave a Review