घोलप महाविद्यालयात दिवाळीनिमित्त सौंदर्य उपचार उपक्रम

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे :

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये व्यायवसायिक अभ्यासक्रमांतर्गत चालणाऱ्या ब्युटी थेरपी अँड ॲस्थेटीक्स विभागामार्फत प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सौंदर्य उपचार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिव-जिजाऊ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका शीतल प्रशांत शितोळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी समन्वयक डॉ. माया माईनकर, विभाग प्रमुख प्रा. रूपाली रसाळे, प्रा. नम्रता पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे प्रास्ताविक करत असताना विभागाच्या समन्वयक डॉ. माया माईनकर यांनी ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाबद्दल माहिती देत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

डॉ. नितीन घोरपडे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित या सौंदर्य उपचार उपक्रमाची संकल्पना व उद्देश स्पष्ट स्पष्ट करत विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर उज्ज्वल भविष्यासाठी ब्युटी थेरपी क्षेत्रातील विविध व्यावसायिक संधीवर प्रकाश टाकत कोरोना काळामध्ये कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत सौंदर्य क्षेत्रामधील काम करणाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले.

शीतल शितोळे यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण निर्माण व्हावे, या उद्देशाने व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. तसेच ब्युटी थेरपीकडे विद्यार्थ्यांनी फक्त एक अभ्यासक्रम म्हणून न बघता व्यवसाय व रोजगाराची सुवर्णसंधी या दृष्टिकोनातून बघणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत सौंदर्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले.

विद्यार्थिनींनी येणाऱ्या दिवाळीचे सणाचे औचित्य साधत महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फेशियल, मेकअप, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, आय ब्रो, मसाज, हेअर कट या ब्युटी थेरपी मधील महत्वाच्या घटकांबद्दल प्रात्यक्षिक केले. विद्यार्थिनींचे या क्षेत्रांमधील परिपुर्ण कौशल्य, उत्कृष्ट सेवा, उत्तम संभाषण कौशल्य तसेच अत्याधुनिक लॅब व प्रशिक्षित शिक्षक बघत उपस्थित मान्यवरांनी विभागाचे अभिनंदन केले.

या उपक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता पवार यांनी, तर आभार प्रा. रूपाली रसाळे यांनी मानले.


Share this Newz