घोलप महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

कोविड – १९ वैश्विक महामारीमुळे प्रदीर्घ काळापासून बंद असलेली महाविद्यालये शासन निर्णयानुसार २० ॲाक्टोबरपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली. या निमित्ताने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभाग अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. संतोष परचुरे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य संतोष ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पारंपारिक पद्धतीने शिक्षण व्यवस्था सुरू झाल्याने शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील परस्पर संवाद वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करत विद्यार्थी व शिक्षकांनी कोविड – १९ विषयक सर्व शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी लसीची दोन मात्रा झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.याप्रसंगी संपूर्ण महाविद्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले असून प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रत्यक्ष सर्व वर्गखोल्या मध्ये जाऊन स्वच्छतेची पाहणी करत आवश्यक तेथे विद्यार्थ्यांसाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

बऱ्याच कालावधीनंतर महाविद्यालयांमध्ये मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. तसेच एकमेकांशी भेटत असताना सर्व विद्यार्थी कोविड – १९ विषयक नियमांचे तंतोतंत पालन करत होते.


Share this Newz