द न्यूज बिज् टीम, पुणे :
पर्यावरण संवर्धनासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याच्या शेवटी आयोजित प्लास्टिक संकलन अभियानाच्या बाराव्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य संतोष ढोरे, समन्वयक डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्लास्टिक संकलन अभियानासारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करत जैवविविधता संवर्धनाचा संदेश देत असल्याबद्दल कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
मागील वर्षभरापासून अभियानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानत प्राचार्य डॅा. नितीन घोरपडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्देश व महत्तव स्पष्ट केले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांच्या पर्यावरण पूरक कृतीमुळे प्लास्टिकच्या समस्येच्या निर्मूलनामध्ये हातभार लागणार असून पर्यावरण संवर्धनामध्ये अशा प्रकारच्या अभियानाचा निश्चितच मोलाचा वाटा असेल, असे मत व्यक्त केले.
प्लास्टिक संकलन अभियानाच्या बाराव्या टप्प्या अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी घरांमधील दुधाच्या पिशव्या, प्लास्टिक बॅाटल्स, प्लास्टिक आवरण व इतर प्लास्टिक टाकाऊ पदार्थ असा एकूण २५ किलो प्लास्टिक कचरा, तसेच आतापर्यंत एकूण ३०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जमा करुन पुढील प्रक्रियेसाठी तो सागरमित्र अभियान, पुणे या पर्यावरणवादी स्वंयसेवी संस्थेकडे जमा करण्यात आला. याकरिता कमिन्स ग्रुप ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभरापासून हा नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले आहे.
या प्लास्टिक संकलन अभियानाच्या यशस्वितेसाठी डॉ. नरसिंग गिरी, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. तनुजा तारू, प्रा. नीलम खोमणे, प्रा. रुपाली रसाळे, प्रणीत पावले, दिनकर बरडे, अवधेश यादव यांच्यासह महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विज्ञान शाखेतील विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







Leave a Review