द न्यूज बिज् टीम, पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सांगवी रुग्णालय, महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व कोरोना प्रतिबंधक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सजग राहत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधून प्रथमच विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारत बाबुरावजी घोलप महाविद्यालयाने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बाबुराव घोलप महाविद्यालयाचे कौतुक केले आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळ समन्वयक डॉ. संतोष परचुरे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. विजय घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीराचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करण्यामागे असलेले उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण करण्यासाठी फॉर्म भरून घेणे, त्याचे विश्लेषण करुन विशेषतः एक मात्रा घेतलेल्या (कोव्हीशिल्ड / कोवॅक्सीन) लसीचे नियोजन करणे, गर्दी टाळण्यासाठीची व्यवस्था इत्यादी घटकांवर प्रकाश टाकत कोविड – १९ काळामध्ये कोविड योद्धे म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बजावलेल्या कामांची माहिती दिली.
डॉ. संतोष परचुरे यांनी लसीकरण शिबीर आयोजित करणे तसेच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कोरोना काळामध्ये स्वंयसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बाबुरावजी घोलप महाविद्यालय व स्वंयसेवकांचे अभिनंदन केले. ॲड. संदीप कदम यांनी ॲाफलाईन पद्धतीने महाविद्यालये सुरू होणे, ही शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब आहे, असे नमूद करत कोविड – १९ मुळे पारंपरिक शिक्षणव्यवस्था ठप्प असताना विद्यार्थांच्या शैक्षणिक वाढीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच अनलॉक मोहिमेंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोरोनाचा धोका अजुन टळला नाही, असे मत व्यक्त करत कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले.
कोविड काळामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांना व प्रशासनाला लसीकरणाच्या कामात मदत करणे, मास्क व सॅनिटायझर वापराबद्दल नागरिकांना सजग करणे, गर्दी आटोक्यात आणणे ही कामे यशस्वीपणे पार पाडली. छात्रांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे व्हिडीओ रुपामध्ये उपस्थितांसमोर सादरीकरण करत असताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह मान्यवरांनी छात्रांचे भरभरुन कौतुक केले. या समाज कार्याबद्दल राष्ट्रीय छात्र सेनेच्या १५ छात्रांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या लसीकरण मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सांगवी रुग्णालय, 3 एम कंपनी, युनिटेड वे, बेंगलोर व वॅक्सीन ॲान व्हील्स या संस्थांनी विशेष सहकार्य केले. शिबिराच्या सुरूवातीला महाविद्यालयामध्ये उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये १२३ शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व १६० विद्यार्थी असे एकुण २८३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यावेळी सर्वांची अँटिजन टेस्ट नकारात्मक आली. सदर लसीकरण शिबिरामध्ये सांगवी रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. रवींद्र मंडपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर हांडे, डॉ. श्रद्धा कोकरे, तसेच डॉ. योगिता सावंत, डॉ. माधवी गाडवे यांच्या नेतृत्वाखालील चमूने लसीची एक मात्रा घेतलेल्या व एकही मात्रा न घेतलेल्या प्रकारांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी गटाचे स्वतंत्र वर्गीकरण करत एक मात्रा झालेल्या ५६ व एकही मात्रा न झालेले १०३ असे सुमारे १५९ विद्यार्थ्यांचे दिवसभरात यशस्वी लसीकरण केले.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र वडशिंगकर यांनी, तर आभार डॉ. विजय घाडगे यांनी मानले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. शकुंतला माने, डॉ. संगीता घोडके, प्रा. प्रकाश पांगारे, प्रा. अमृता इनामदार, डॉ. विद्या पाठारे, प्रा. सोनल कदम, लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी, प्रा. प्रीती भारंबे, रामदास चिंचवडे, प्रणित पावले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.









Leave a Review