द न्यूज बिज् टीम, पुणे :
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी व वर्तमानपत्र कसे वाचावे याबद्दल परिपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यम अभ्यासक प्रा. योगेश बोराटे यांचे ‘वर्तमानपत्र का व कसे वाचावे?’ या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करत वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा. सुवर्णा खोडदे, ग्रंथपाल लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी, डॉ. विजय बालघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘वर्तमान पत्र का व कसे वाचावे?’ या विषयावर मार्गदर्शन करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील प्रसिद्ध लेखक, पत्रकार व माध्यम अभ्यासक प्रा. योगेश बोराटे यांनी सर्वप्रथम वृत्तपत्र ही संकल्पना स्पष्ट करत वृत्तपत्राचा इतिहास व महत्त्व, माहिती प्रसारण क्षेत्रातील पारंपरिक व आधुनिक माध्यमे, विशेष पुरवणी तसेच प्रसारमाध्यमे व वर्तमानपत्रे यांच्या परस्पर संबंधावर सविस्तर प्रकाश टाकला. वृत्तपत्र वाचत असताना वृत्तपत्राचे नाव व टॅगलाईन या गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे नमुद करत वृत्तपत्रांचा आशय स्पष्ट करणाऱ्या बातम्या, लेख व जाहिराती या तीन प्रकारांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, वाचनाने माणूस समृद्ध होतो. वर्तमानपत्राच्या संपादकीय व अग्रलेखांमधून वैचारिक खाद्य मिळते. आजच्या दिवशी प्रत्येकाने वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी एकतरी पुस्तक वाचावे, तरच खऱ्या अर्थाने ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन होईल, असे आवाहनही विद्यार्थ्यांना केले.
डॉ. विजय बालघरे यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा खोडदे यांनी, तर आभार लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांनी मानले.
या ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. व्याख्यानाच्या तांत्रिक यशस्वितेकरिता प्रा. सोनल कदम, प्रा. कीर्ती करंजावणे, वीरेन चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.







Leave a Review