घोलप महाविद्यालयामध्ये जागतिक पर्यटन दिन उत्साहात

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यटन दिन ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, व्यावसायिक अभ्यासक्रम समन्वयक प्रा. दिपाली जोशी, पर्यटन विभाग प्रमुख प्रा. सद्दाम घाटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम अंतर्गत चालणाऱ्या प्रवास व पर्यटन व्यवस्थापन (पदवी अभ्यासक्रम) विभागाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करत असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यटन परिषदेमार्फत संपूर्ण जगभरामध्ये साजरा होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना उपस्थित विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केली. तसेच कोरोना काळामुळे पर्यटन व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या सद्यस्थितीवर भाष्य करत लवकरच संपूर्ण जगभरामध्ये पर्यटन व्यवसाय नव्याने भरारी घेईल, अशी आशा पर्यटन दिनाच्या निमित्ताने व्यक्त केली.

महाविद्यालयातील पर्यटन विभागाने सामंजस्य करार केलेल्या कोथरूड येथील एल एन ट्रॅव्हल्सच्या संचालिका नयना बलकुंदी यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाविद्यालयाला भेटवस्तू देत पर्यटन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयातील विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी ‘राष्ट्रीय महिला खेळाडूंच्या क्रीडा कार्यमानाचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता. त्यांना चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. शरद आहेर व प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन शितोळे, संतोष कुंभार, राजेश लांडगे यांनी विशेष सहकार्य केले.


Share this Newz