द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपळे गुरव येथील काशीद पार्कमधील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असते. तसेच पिण्याचे पाणी न आल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले असते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तानाजी जवळकर यांनी पुढे सरसावत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी बोलून पाईपलाईनचे काम करून घेतले. अन्यथा मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले असते.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात अगोदरच नेहमीच पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. त्यात रात्रीच्या वेळी अचानक पाईपलाईन फुटल्यास मोठ्या समस्येचा नागरिकांना सामना करावा लागतो. परिसरात मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. शनिवारी रात्री अचानक पाईपलाईन फुटली.
परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तानाजी जवळकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तानाजी जवळकर यांनी पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करण्यास सांगितले.
पाणीपुरवठा अधिकारी मोरे साहेब आणि पावरा साहेब यांनी तात्काळ दखल घेतली आणि काही वेळातच कर्मचारी पाठवून फुटलेली पाईपलाईन जोडून घेतली.
तात्काळ काम पूर्ण केल्याने तानाजी जवळकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
तर नागरिकांनी तानाजी जवळकर यांचे आभार मानून धन्यवाद दिले. आपल्याला कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास रात्री अपरात्री कधीही फोन उचलून आपली समस्या सोडविण्यास बांधील असल्याचे तानाजी जवळकर यांनी नागरिकांना आश्वासन दिले.








Leave a Review