घोलप महाविद्यालयातर्फे शासकीय योजनांबाबत जनजागृतीद्वारे राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदे, चाले, लवळे, करमोळी व डोंगरगाव या मुळशी तालुक्यामधील पाच गावांमध्ये सहकार मंत्रालयाद्वारे ‘सहकार सेवा समृद्धी’ या अभियानातंर्गत राष्ट्रीय सहकारी परिषदेचे थेट प्रक्षेपण करत शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला भेट देणाऱ्या पथकांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले की, नव्याने निर्माण झालेल्या सहकार मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल राष्ट्रीय सहकारी परिषदेमध्ये विद्यमान सहकार मंत्री मा. अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ग्रामीण विकासा करिताच्या शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे गरजेची असून, सद्य स्थिती लक्षात घेता कोविड – १९ विषयक शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पथकातील सदस्यांना केले.

चांदे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले. गावामध्ये लसीकरण सुरू असल्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापकांनी उपस्थित ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी चांदे गावचे सरपंच अशोक ओव्हाळ, उपसरपंच रेश्मा खानेकर तसेच विद्यमान पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. चांदे गावातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. मनीषा शेवाळे, डॉ. सतीश एकार, डॉ. ज्ञानेश्वर महाजन, प्रा. सद्दाम घाटवाले यांनी परिश्रम घेतले. यावेळी ५१ ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

करमोळी व चाले गावातील पथकामध्ये राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश्वर जांभूळकर, प्रा. प्रकाश पांगारे, प्रा. विक्रम मालतुमकर, लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी, दिनेश भगत, अजय कसाब यांचा समावेश होता. याप्रसंगी सरपंच शरद केदारी, ग्रामसेविका राणी अडसूळ, पोलीस पाटील महेश अलहट यांनी विशेष उपस्थिती राहत बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमामध्ये करमोळी व चाळे गावातील अनुक्रमे ५५ व ४६ ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
लवळे गावामध्ये डॉ. राणी भगत, प्रा. विद्या पाठारे यांनी प्रोजेक्टर द्वारे उपस्थित सुमारे ४९ ग्रामस्थांसमोर सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले. यावेळी लवळे गावचे सरपंच निलेश गावडे, माजी सरपंच संजय सातव, ग्रामपंचायत सदस्य अजित चांदिलकर, राणी केदारी यांची विशेष उपस्थिती होती.

डोंगरगाव येथे आयोजित कार्यक्रमामध्ये गावच्या सरपंच धनश्री पालकर, माजी सरपंच पुंडलीक पासलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णु जोरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अमृता इनामदार, प्रा. सोनल कदम, डॉ. नरसिंग गिरी, विजय चंदनशिवे, श्रीराज भोईटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. यावेळी ४७ ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.

या संपूर्ण उपक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. लमेश निकम यांनी भेट देत कार्यक्रमाचा आढावा घेत ग्रामस्थांचा सक्रिय सहभागासाठी काय करता येईल, याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील सचिन शितोळे यांनी विशेष सहकार्य केले. शासकीय योजनांची माहिती ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यासाठी घोलप महाविद्यालय करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Share this Newz