प्रभावी व्यक्तिमत्वासाठी जीवन कौशल्ये आवश्यक: डॉ. नितीन घोरपडे

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

पारंपरिक अभ्यासक्रमातील धडे आत्मसात करण्याबरोबरच प्रत्येकाने विविध कौशल्ये आपल्या अंगीकारणे आवश्यक आहे. विशेषतः आपण काम करत असलेल्या ठिकाणी उत्तम संभाषण, नेतृत्वगुण, व्यवस्थापन अशा अनेक गुणांनी आपल्या कामाची निराळी छाप पडत यामधून आपले व्यक्तिमत्व प्रभावी बनण्यास मदत होते, असे मत प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विभागाच्यावतीने ‘सॉफ्ट स्कील्स ॲट वर्क प्लेस’ या विषयावर आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संगीता घोडके, डॉ. माया माईनकर, वरिष्ठ लिपिक अनुरिता गायकवाड, व्याख्यात्या विवेकी पास्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सॉफ्ट स्कील्स ॲट वर्क प्लेस’ या विषयावर मार्गदर्शन करत असताना इंग्रजी भाषा तज्ञ विवेकी पास्ता यांनी सर्वप्रथम सॉफ्ट स्कील्स ही संकल्पना स्पष्ट करत कामाच्या ठिकाणी या विषयाच्या महत्वासंदर्भात करण्यात आलेले विविध संस्थांचे सर्वेक्षण उपस्थितांसमोर ठेवले. तसेच उत्तम व्यक्तिमत्वासाठी आवश्यक अंगभूत गुणांची माहिती देत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची व्हिडिओद्वारे माहिती देत त्यांच्या कार्यामधून झळकणारी विविध कौशले उपस्थितांसमोर विशद केली. त्याचबरोबर सॉफ्ट स्कीलमुळे सकारात्मक व्यक्तिमत्व बनण्यास मदत होते असे नमूद करत कामाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक संभाषण, टीम वर्क, नेतृत्वगुण, समस्या निराकरण, अनुकूलता, कार्य नीती या सहा प्रकाराबद्दल सादरीकरणासह सविस्तर माहिती दिली.

व्याख्यानानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अतिशय सहज व सोप्या भाषेमध्ये विविध उदाहरणांचा दाखला देत त्यांचे शंकानिरसन केले.
याप्रसंगी सॉफ्ट स्कील्स विषयावर व्याख्यानाचे आयोजन केल्याबद्दल सर्व संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचे आभार मानत या व्याख्यानाचा व्यक्तिमत्व विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, अशी भावना व्यक्त केली.
महाविद्यालयातील लिपिक विनोद रणपिसे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.

या ऑनलाइन व्याख्यानाचे सूत्रसंचालन प्रा. भास्कर घोडके, तर आभार प्रदर्शन अनुरिता गायकवाड यांनी केले. सदर व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या सभागृहात ४० तर झूम व यु- ट्युब लाइव्ह द्वारे ७० असे सुमारे ११० संशोधक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Share this Newz