सांगवीतील फिनिक्स ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने शिवप्रेमी शंकर जगताप यांचा सन्मान

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI
सिंहगडावरिल नरविर तानाजी मालुसरे यांच्या समाधीची देखभाल करण्याचे काम पिंपळे गुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने स्वीकारले आहे. या कार्याबद्दल जुनी सांगवीतील फिनिक्स ट्रेकर्स ग्रुपच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष, शिवप्रेमी माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा सिंहगडावर मावळा पगडी, पंचधातूची शिवमुद्रा व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

यावेळी फिनिक्स ग्रुपचे अध्यक्ष नगरसेवक संतोष कांबळे, राहुल विधाटे, हर्षल संतोष कांबळे, ईश्र्वर काटे, गोते, नेताजी चिवरे, हेमंत पाडुळे, शिवाजी निम्हण, आर्यन जगताप, विरेंद्र जगताप, ऐश्वर्या रेणुसे, निमिष कांबळे, रविंद्र यादव, संजय जगताप, विक्रम कदम, संदिप गायकवाड यांच्या हस्ते मावळा पगडी, शिवमुद्रा व सन्मानपत्र देवून शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले.

जुनी सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने फिनिक्स ट्रेकर्स कडून ऑक्टोबर २००९ पासून सलग १२ वर्षे एकही रविवार न चुकता आजपर्यंत त्यांनी सिंहगड ट्रेक, परिसराची स्वच्छता केली आहे. दुर्गभ्रमंती, गड स्वच्छता व तरूणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी युवकांचा फिनिक्स ट्रेकर्स ग्रुप सुरू करण्यात आला आहे.

निर्व्यसनी तरुणांची फळी निर्माण व्हावी. आदर्श युवक घडावा ही या मागील संकल्पना असून, शिवप्रेमी मंडळींचा या उपक्रमात सहभाग असतो. ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे चंद्ररंगचे अध्यक्ष माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले.


Share this Newz