The Newz Biz Team, PIMPRI
वेळ सकाळी साडेनऊची. ठिकाण पिंपळे गुरव वैदू वस्तीमधील प्रभातनगर. एक दुचाकीस्वार मजूर अड्ड्याकडून भगतसिंग चौकाच्या दिशेने निघालेला. अचानक दुचाकी घसरते आणि दहा फूट खोल पावसाळी चेंबरमध्ये पडते. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा जीव वाचला. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. स्मार्ट सिटी अंतर्गत संथ गतीने सुरू असलेली कामे आता नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहेत, हे मात्र नक्की.
पिंपळे गुरवमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र, संथगतीने सुरू असलेली कामे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहेत. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कामावर जाण्याची घाई असतानाच येथील प्रभातनगरमध्ये श्रेयश मंगल केंद्राच्या समोर एक दुचाकी घसरून उघड्यावर असलेल्या पावसाळी चेंबरमध्ये जाऊन पडली. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला. दुचाकीस्वार चेंबरमध्ये पडला असता, तर चेंबरमधील लोखंडी सळया शरीरात घुसुन मोठी इजा झाली असती. कदाचित दुचाकीस्वाराचा जीवही जाण्याची शक्यता होती.
परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, मोठे अपूर्ण चेंबर उघडेच असलेले दिसतात. तसेच पदपथावर सिमेंट ब्लॉकही अस्ताव्यस्त पडलेले असतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक याला ठेचकळून पडण्याचा घटना नित्याच्या झाल्या आहेत. उघडयावर असणाऱ्या चेंबरभोवती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे बॅरिगेट लावलेले नाहीत. नशीब बलवत्तर होते म्हणून हा दुचाकीस्वार वाचला. जीव गेला असता तर याला जबाबदार कोण ? असा सवाल नागरिक करीत आहेत.
या अपघातात दुचाकीस्वार दत्ता रमेश कोळी (वय २२) यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कोळी यांच्या पायाला, हाताला, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. येथील दुकानदार नितीन कदम यांनी कोळी यांना बाजूला करीत प्रथमोपचार केले. या अपघाताची माहिती मिळताच युवा नेते अमरसिंग आदियाल, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शामभाऊ जगताप, तानाजी जवळकर यांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वाराला धीर देत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कासवगती कामाबद्दल संताप व्यक्त केला.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. पावसाळी पाणी वाहून जाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याची कामे अगदी संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे येथील नागरिक याकामामुळे हैराण झाले आहेत. ठेकेदार म्हणतील ती पूर्वदिशा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक विद्यमान नगरसेवक फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, जे चुकीचे आहे. चुकीची कामे करणारांवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक
दहा फूट खोल असलेल्या चेंबरमधील पाईपलाईन, लोखंडी सळया बाहेर आल्या होत्या. या सळया दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या असत्या. महत्त्वाचे म्हणजे प्रशासन आणि त्यांचे ठेकेदार हे एक काम अपूर्ण असतानाच दुसरे काम हाती घेत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नगरसेवकांनी एक काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी खोदाई करू दिली नाही पाहिजे. पण विद्यमान फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.-अमरसिंग आदियाल, युवा नेते







Leave a Review