The Newz Biz Team, PIMPRI
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र जगताप मित्र परिवार व कै.गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ४०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या विक्रमी रक्तदान शिबिराची राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजेंद्र जगताप यांचे शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.
कोरोना महामारी संकट काळामध्ये कोणत्याही रूग्णाला रक्ताची कमतरता भासू नये, यासाठी राज्य सरकारने खबर घेतली होती. याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना रक्तदान शिबिराबाबत आवाहन तसेच जनजागृती करण्याविषयीच्या सूचना दिल्या होत्या. उपमुख्यमंत्री पवार तसेच राष्ट्रवादीचे अन्य मंत्री व पदाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प केला होता.

राजेंद्र जगताप मित्र परिवार, कै.गणपतराव जगताप प्रतिष्ठानचे कार्यकर्ते या शिबिराच्या यशस्वितेसाठी जोरदार तयारी करत होते. यासाठी परिसरातील विविध समाजमाध्यमातून जाहिरातीद्वारे रक्तदात्यांना आवाहन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. या ठिकाणी ४०५ बॅगा रक्त संकलित करण्यात आले.
नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान झाल्याने संपूर्ण शहरभर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिबिरास भेट दिल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनीही शिबिरास मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल राजेंद्र जगताप यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, राजेंद्र जगताप यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.











Leave a Review