तळेगाव शहर पत्रकार संघाकडून भोजन थाळी केंद्रांना आर्थिक मदत

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

राजकारणाच्या पलिकडे जाऊन समाजहित जोपासणार्‍या उपक्रमांना शाबासकीचे थाप देणारे पत्रकार, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजाची दशा आपल्या लेखनीतून मांडून योग्य काम करण्याचा लौकिक प्राप्त करणारे हे पत्रकार असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक होते. त्याद्वारे त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आणि त्याचाच वसा आणि वारसा या पत्रकार संघाकडून पुढे चालविला जात असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले.

मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 175व्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार संघातर्फे शहरात गरजू, गोरगरीब यांसह कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांकरिता जनसेवा विकास समितीच्या वतीने दररोज दुपारी ‘जनसेवा भोजन थाळी’ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी ‘नमो भोजन थाळी’ वितरीत केली जात आहे. या अनुकरणीय व अभिनंदनीय उपक्रमास तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने देणगीचा धनादेश वितरणप्रसंगी भेगडे बोलत होते.
जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी पत्रकार या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत असून कार्यरत असलेल्या या सामाजिक कार्याला केलेली ही मदत म्हणजे कौतुकाची थाप आहे. यामुळे आमच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळाली असून जनसेवा भोजन थाळीचे वितरण कायमस्वरुपी सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने व जनसेवेचे किशोर आवारे यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे धनादेश पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे व माजी अध्यक्ष सुनील वाळुंज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी भाजप नगरसेवक संतोष दाभाडे (पा.), माजी नगरसेवक सचिन टकले, जनसेवेचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, रविंद्र साबळे, दिलीप डोळस, किरण ओसवाल, विनायक भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे यांनी प्रास्ताविक, तर सोनबा गोपाळे यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन संघाचे सचिव अतुल पवार यांनी केले. तर आभार सुनिल वाळुंज यांनी मानले. मच्छिंद्र बारवकर व श्रीकांत चेपे यांनी सहकार्य केले. सर्व पत्रकारांच्या हस्ते गरजूंना यावेळी जनसेवा थाळीद्वारे अन्नदान करण्यात आले.

 


Share this Newz