The Newz Biz Team, PUNE
संपूर्ण नाव लक्ष्मण दगडू भांडवलकर, पण पंचक्रोशीत ‘फिटर अण्णा’ या नावाने परिचित. अण्णांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अत्यंत दुःख वाटले. अण्णांचे अचानक जाणे क्लेशदायक आहे. गरिबांच्या प्रती आस्था असणारे अण्णा सर्वांना सोबत घेऊन चालणारे एक आदर्श शेतकरी होते.
फिटर हे नाव कसे पडले, असे विचारल्यावर अण्णा सांगायचे की, गेल्या पन्नास-साठ वर्षापूर्वीच्या परिस्थितीविषयी बोलताना अण्णा म्हणायचे दीड रुपया रोजाने सालकरी गडी म्हणून मी सालाने होतो. पुर्वी विहिरीवर मोट आणि इंजिन मोठ्या प्रमाणात असत. इंजिन खराब झालं, की दुरुस्त करणारा माणूस यायचा. तो इंजिन खोलायला लागला की मी जवळ थांबून निरीक्षण करायचो. तो माणूस इंजिन कसा खोलतो, परत कसा बसवतो हे मी लक्षपूर्वक डोक्यात ठेवले. पुढे हळूहळू मीच इंजिन खोलू लागलो व दुरुस्त करू लागलो. या कामात नाव कमावले म्हणूनच मी पंचक्रोशीत फिटर नावाने प्रसिद्ध झालो. या स्वकलेमुळे अनेक रोजगार मिळाले. त्यामुळे परिस्थिती सुधारली.
अण्णा स्वतः कष्टाविषयी अत्यंत प्रामाणिक राहिल्यामुळे स्वकष्टाने लघु उद्योग चालू केले. पिठाची गिरणी, धान्य करण्याचे उपनेर, विहीर खोदण्याचे क्रेन इत्यादी साधनांच्या माध्यमातून अण्णांनी व्यवसायामध्ये मोठा जम बसवला. परिस्थितीशी इमान ठेवून अण्णा नेहमी वागत. त्यांच्या बोलण्यात वागण्यात मीपणा कधीच जाणवला नाही. अल्प काळातच परिस्थिती चांगली करू शकलो.
सर्व मुलांना स्वतःचा व्यवसाय चालू करून दिले. प्रत्येकाला व्यवसायाची गोडी निर्माण करून दिली.
कष्टाला पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले होते. हेच त्यांनी संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यात बिंबवले. हे संपूर्ण कुटुंब अशिक्षित असूनदेखील व्यावहारिक ज्ञान परिपूर्ण होते. भविष्याचा वेध घेण्याची ताकद अण्णामध्ये होती. आयुष्यात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ते सर्व निर्णय यशस्वी करून दाखवले.
अण्णा कमालीचे शांत, पण व्यूहरचना करताना त्याहून जास्त मुसद्दी. खूप शांतपणे नियोजनबद्ध पद्धतीने ते पावले टाकत. चौंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून पाच वर्ष होते. तेव्हापासून त्यांना सर्व गावाविषयी तळमळ, कळकळ होती. हे गावातील सर्व समाजाच्या विवाह प्रसंगी जाणवत. अण्णा जातीने हजर राहून कार्याच्या धन्याला मदत करण्यासाठी नेहमी पुढे हात करत. तसेच दुःखद प्रसंगी गावातील सर्व कुटुंबांना सांत्वन करण्याचे कलाकौशल्य त्यांच्याकडे होते. गावातील सर्व समाजातील अडचणीत असलेल्या माणसाला आधार देऊन त्याला अडचणीतून बाहेर काढण्यात अण्णा नेहमी पुढे असत. अत्यंत प्रगल्भ मेहनती, जमिनीवर पाय असणारा, सुसंस्कृत, सरळ मार्गे, कष्टाळू प्रमाणिक शेतकरी होते. त्यांना परिस्थितीचा कधीच गर्व नव्हता.
अण्णा हे माझ्या कुटुंबाला एक आधार होते. माझ्या कुटुंबाचे चाळीस वर्षापासूनचे ऋणानुबंध होते. अण्णांच्या घरात आम्हाला भावंडांना मुक्त प्रवेश होता. आमच्या सुखदुखात अण्णा नेहमी सक्रिय असायचे. माझ्यासहित माझ्या सर्व भावंडांचे विवाह अण्णांच्या हाताने झालेले आहेत. आमच्या कुटुंबात कोणताही निर्णय घ्यायचा असेल, तर प्रथम अण्णाचा विचार घेऊन आम्ही निर्णय घ्यायचो. माझ्या आईवडिलांचा अण्णांवर खूप विश्वास होता. पुढे अण्णांनी आम्हाला सर्वांना योग्य असे मार्गदर्शन केले, म्हणून आम्ही घडलो.
अण्णांच्या आज अनंत आठवणी आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏 – प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे







Leave a Review