The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर येथील स्मशानभूमीमध्ये पक्ष्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने आरोग्य सहाय्यक दीपक माकर यांनी मातीची मोठी भांडी ठेवली आहेत. या उपक्रमाबद्दल दीपक माकर यांचे कौतुक होत आहे. हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट नसून, तो पावसाळ्यापर्यंत चांगला पाऊस पडेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे दीपक माकर यांनी सांगितले.
माकर यांना पक्षी, प्राणी यांच्याविषयी तळमळ आहे. उन्हाळ्यात विविध प्रकारचे पक्षी पाण्याच्या शोधात असतात. पाण्याअभावी अनेक पक्ष्यांना प्राणही गमवावे लागत आहेत. त्यामुळे पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. शहरात निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दलची चांगलीच जनजागृती झाली आहे. त्याची प्रचिती सध्या दिसून येत आहे. सध्याच्या कडक उन्हाळयाचा विचार करून शहरात नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवलेली दिसून येत आहेत. कोणी मातीच्या भांड्यात, तर कोणी प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे पहावयास मिळत आहे. माध्यमांमुळे पर्यावरणा बद्दलच्या जाणिवा प्रगल्भ होऊ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाचा विचार करून पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा विचार हा त्याचाच एक परिणाम आहे.

स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा वावर वाढला आहे. चिमण्या, कावळे, कबूतरे, साळुंखी आदी पक्ष्यांची गर्दी वाढू लागली आहे. सर्व ठिकाणच्या नागरिकांनी आपापल्या भागामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची शक्य तितकी व्यवस्था करावी, असे आवाहन दीपक माकर यांनी केले आहे.








Leave a Review