The Newz Biz Team, Pune
भारतीय संविधानातील मूल्य दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, यासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या प्रसिद्धी व प्रकाशन विभागाच्या प्रमुख आरती डोळस यांनी केले. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या शिवाजीनगर येथील संतमाई स्किल डेव्हलपमेन्ट सेंटर येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना विविध उदाहरणांचा दाखला देत आरती डोळस यांनी संविधानाच्या उद्देशिकेचा अर्थ समजावून सांगितला. त्या म्हणाल्या, की कौशल्य प्रशिक्षणाद्वारे समाजातील वंचित घटकाला रोजगारक्षम प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे, संचालिका स्मिता धुमाळ तसेच संस्थेच्या प्रशिक्षिका व विद्यार्थिनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळत मोजक्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले.













Leave a Review