जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना मलेशियामध्ये कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू आढळला आहे. त्यामुळे महामारीचे संकट अधिकच गहिरे होण्याचा धोका वाढला आहे.

मलेशियात आढळलेल्या विषाणूचा संसर्ग कोरोनाच्या तुलनेत दहापट वेगाने होत आहे. या विषाणुचे नाव डी614 जी असे आहे. भारतातून मलेशियात गेलेल्या एका हॉटेल व्यवसायिकाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही जणांमध्ये हा विषाणू आढळला आहे.

४५ कोरोना रुग्णांपैकी तिघांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. यापैकी एका गटाला भारतामधून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग झाला होता. या व्यक्तीने विलगीकरणाच्या नियमाचे पालन केले नाही. त्याच्या संपर्कात आलेल्या 45 जणांना कोरोनाची बाधा झाली. या व्यक्तीला पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच, फिलिपिन्सवरून मलेशियात परतलेल्या काही जणांमध्येही या विषाणूचे अंश आढळले आहेत. जगभरातील इतर देशांपेक्षा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यामध्ये मलेशियाला चांगले यश मिळाले असले तरी काही दिवसांपासून येथील बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणूमध्ये यापूर्वीही बदल झाल्याचे आढळून आले आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये हे प्रामुख्याने दिसून आले आहे. विषाणूच्या आरएनएमध्ये ( जनुकीय रचना) बदल झाल्याचे दिसून आले होते. मात्र, त्यामुळे हा विषाणू घातक झाल्याचा पुरावा उपलब्ध नसल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले होते.

मलेशियातील आरोग्य खात्याच्या व्यवस्थापकीय संचालक असणार्‍या नूर हीशाम अब्दुल्ला यांनी या नवीन विषाणूवर सध्या शोध, सुरू असणारी औषधे आणि लस प्रभावी ठरणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आता मलेशियामध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या नवीन विषाणूमुळे होणार्‍या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे.