पुणे :
पुण्यातील गणेशोत्सवात सुमारे 25 ते 30 लाख नारळांची विक्री होते. मात्र, यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार असल्याने सुमारे 50 टक्क्यांनी नारळाला मागणी घटली आहे. अतिवृष्टीमुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. ग्राहकांकडून मागणी घटली असली, तरी उत्पादन घटले असल्याने शेकड्याच्या दरात 100 ते 200 रूपयांनी वाढ झाली आहे.
सद्य:स्थितीत शहरात 2 ते 2.5 लाख नारळांची आवक होत आहे. मागील वर्षी याच काळात 3.5 ते 4 लाख नारळांची रोज आवक होत होती. यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले आहे. मागणीतही घट झाली आहे. कोरोनामुळे ऑर्डर देऊनही गाड्या वेळेत पोहचत नसल्याने व्यापार्यांकडे माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. मात्र घराघरांत गणपती बसविला जातो. त्यामुळे पूजेसाठी तसेच कलश स्थापनेसाठी नारळाला मागणी असणार असल्याचेही बोरा यांनी नमुद केले.
घाऊक बाजारात कर्नाटक येथून साफसोल आणि मद्रास, तामिळनाडू येथून नवा नारळ, तर आंध्र प्रदेशातून जुन्या नारळाची आवक होते. नवा नारळ वजनाला हलका असतो. त्यामुळे या नारळाचा तोरणासाठी वापर केला जातो. पूजेसाठी साफसोल आणि जुन्या नारळाचा वापर केला जातो. तर मोदकासाठी तसेच हॉटेल्स आणि खानावळीत साफसोल आणि मद्रास नारळाचा वापर केला जातो. मात्र यावेळी कोरोनामुळे हॉटेल्स आणि खानावळी अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नारळाच्या उलाढालीला मोठा फटका बसला आहे. राज्य, देश तसेच जगभरातून शहरात येणार्या गणेश भक्तांना यंदा मर्यादा आहेत. त्यामुळे नारळाची खरेदी करणार्या ग्राहकांची संख्याही घटली आहे. या एकूणच कारणांमुळे नारळाला मागणी घटली असल्याचेही बोरा यांनी सांगितले.











Leave a Review