पुणे :
पुण्यातील आघाडीच्या शिक्षण आणि संशोधन संस्था, प्रयोगशाळा तसेच उद्योग या क्षेत्रांना एका व्यासपीठावर आणून त्याद्वारे त्या परिसरातील आणि राष्ट्रीय पातळीवरील समस्यांवर अभ्यास आणि संशोधनावर आधारित उपाय शोधून काढण्यासाठी पुणे क्लस्टर नॉलेज च्या स्थापनेला केन्द्र सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे.
अशी मान्यता मिळालेल्या मोजक्या शहरांमध्ये पुण्याने आघाडी घेतली आहे. भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून यासाठी अर्थिक निधी पुरविला जाणार आहे. याचा कालावधी 3 वर्षांचा असून, त्यानंतर संबधित क्लस्टरची कामगिरी पाहून त्याच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकेल. या प्रकल्पाशी संबधित पदाधिकार्यांनी त्याची अधिकृत घोषणा आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंड्स्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर ने आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पुणे नॉलेज क्लस्टर चे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आणि आयुका (आय यु सी ए ए ) चे माजी संचालक डॉ. अजित केंभवी, या क्लस्टरचे को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आणि आयआयएसई आर चे बॉयोलॉजीचे प्राध्यापक (सध्या अशोका विद्यापीठाशी संलग्न) एल एस शशीधर, आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्हेंचर सेंटरचे संस्थापक संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ, पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे, मराठा चेंबरचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव आणि महासंचालक प्रशांत गिरबाने यावेळी उपस्थित होते.
केंभवी यांनी या क्लस्टर योजनेच्या विविध वैशिष्टयांचा आढावा घेणारे सादरीकरण केले . या व्यासपीठादारे पुणे आणि परिसरातील विज्ञान, तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकता या विविध क्षेत्रांशी निगडित संस्था आणि संघटनांमधील उच्च पातळीवरील तज्ञ एकत्र येऊ शकणार आहेत. यात विविध विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन प्रयोगशाळा राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संशोधन आणि विकास आस्थापना आणि उद्योगांचा समावेश असेल.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के विजय राघवन यांनी गेल्या सप्टेंबर मध्ये पुणे आणि परिसरातील शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांच्या भेटीगाठी घेऊन हा विषय त्यांच्यापुढे मांडला होता . प्रा . अजित केंभवी आणि एल. एस. शशीधर यांनी क्लस्टरच्या वतीने प्रारंभिक प्रस्ताव सरकारला सादर केला होता. ‘द इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ म्हणजेच आयुका या योजनेची फॅसिलिटेटर म्हणून कार्य करणार असून, त्याचे संचालक सरकारच्या निधीचा विषय हाताळतील.
शहरातील जगण्याचा दर्जा वाढावा म्हणून मोठ्या प्रमाणावर काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. त्यात एकात्मिक इलेक्ट्रिक मल्टीमोडल ट्रान्स्पोर्ट, पुणे डिजिटल टिन आणि शहराचे पाणी व्यवस्थापन यांचा समावेश आहे. संसर्गजन्य रोगाबाबत महाराष्ट्रासाठी डेटा बेस तयार करणे, इंडियन कॅन्सर जिनोम अॅटलास, सर्जिकल प्रॉडक्ट्स ट्रान्सलेशन अॅक्सिलरेशन सेंटर, डायग्नॉस्टिक्स अॅट स्केल ( स्केल डी एक्स), इलेक्ट्रिक मोबिलिटी इनिशिएटिव्ह या प्रकल्पांसाठी निधीसाठीचे प्रस्तावही सादर करण्यात आले आहेत. पर्यावरण, आरोग्य, इलेक्ट्रिक मोबिलिटी, बिग डेटा आणि अर्टिफिशिअल इंटेलिजन्स या प्रमुख शाखांवर क्लस्टरचा भर असेल.
प्रा केंभवी यांच्या म्हणण्यानुसार अशा क्लस्टर साठी पूणे हे आदर्श शहर आहे. हे शहर नॉलेज आणि इंडस्ट्री हब म्हणून ओळखले जाते. शहराच्या विकासाचे प्रकल्प शोधून काढून त्यावर एकत्रित रीत्या काम केले जाणार आहे. या उपक्रमासाठी स्वतंत्र सीईओ नेमला जाणार आहे, त्याचे काम येथील मध्यवर्ती कार्यालयातून चालणार असले तरी, त्याचे विविध उपक्रम शहराच्या वेगवेगळ्या भागात चालतील. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्र येऊन परस्परांच्या गरजा ओळखव्यात आणि अभ्यासक्रमात योग्य ते बदल करावेत, ही फार वर्षांपासूनची अपेक्षा आता या क्लस्टरमुळे पूर्ण होऊ शकते, याबद्दल कुलगुरू डॉ. करमळकर यांनी समाधान व्यक्त केले.









Leave a Review