अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस

Share this Newz

नवी दिल्ली :  ऑनलाईन 

        अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सिनेटर कमला हॅरिस यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. या पदासाठी निवडणूक लढविणा-या कमला हॅरीस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन या भारतीय तर वडील डोनाल्ड हॅरिस हे जमैकन आहेत. मात्र, कमला हॅरिस या स्वत: ला कोणत्याही वर्णाशी किंवा देशाशी जोडण्याऐवजी अमेरिकन म्हणण्यास प्राधान्य देतात.

या वर्षा अखेरीस अमेरिकेच्या अध्यक्षीय निवणूक येऊ घातली आहे. तत्पूर्वी या निवडणुकीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट आहे. असे असले तरी अमेरिकेत निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच डेमोक्रॅटिक पक्षाने आपले राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार घोषीत करून दंड थोपटले आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांनी कमला हॅरीस यांचे नाव जाहीर करताना त्या एक शूर योद्धा आणि अमेरिकेच्या सर्वोत्कृष्ट नोकरशहा असल्याचे वर्णन केले आहे.

बिडेन यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘कमला हॅरिस कॅलिफोर्नियाची अटर्नी जनरल असल्याने मी त्यांना काम करताना पाहिले आहे. त्यांनी मोठ्या बँकांना आव्हान दिले आहे, काम करणा-या लोकांना मदत केली आहे आणि महिला व मुलांना शोषणापासून संरक्षण दिले आहे. त्यांच्या शिस्तप्रिय कामाचा मला कायमच अभिमान आहे.’

कमला हॅरीस या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. त्यांची आई श्यामा गोपालन हॅरीस यांचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये झाला होता. त्या कॅन्सर रिसर्चर म्हणून काम करत होत्या. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. तर वडील डोनाल्ड हॅरीस कॲरेबियन बेटांमधील जमैका या देशाचे आहेत. ते सध्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. कमला हॅरिस आणि त्यांची लहान बहिण माया हॅरीस या लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते.

कमला हॅरीस दक्षिण भारतीय खाद्य पदार्थ खायला आवडतात. त्यांना भारतीय आईची मुलगी असल्याचा अभिमान आहे. त्या आपल्या प्रत्येक राजकीय भाषणात आई श्यामला गोपालन यांचा उल्लेख करतात.

कमला यांनी आपले पदवीचे शिक्षण हावर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांची कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल पदी निवड झाली. या पदावर पोहचणा-या कमला या पहिल्या महिला आणि आफ्रो-अमेरिकन आहेत. कमला हॅरीस यांनी २०१७ मध्ये कॅलिफोर्नियातून संयुक्त राज्य सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्नमेंट अफेयर्स कमिटी, इंटेलिजन्सशी संबधित सिलेक्ट कमिटी, ज्युडिशियल कमिटी आणि बजेट कमिटीवरही काम केले आहे.

डेमोक्रॅटीक पक्षाच्या वतीने भारतीय-आफ्रिकन वंशाच्या कमला हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने आगामी निवडणुकीचे समीकरण रोचक बनविले आहे. गेल्या वर्षीच्या सुरूवातीस कमला हॅरिस यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र तत्पूर्वीच त्या पदासाठी जो बिडन यांच्या नावाची घोषणा झाली. आता पुढील राजकीय घडामोडी काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share this Newz