नवरात्रौत्सव सुरक्षित वातावरणात साजरा करा; दांडिया खेळताना महिला, मुलींची सुरक्षितता महत्वाची : सांगवी पोलिसांचे आवाहन

Share this Newz

सांगवी, वार्ताहर :
नवरात्र उत्सव साजरा करताना सणाचे पावित्र्य राखले जावे, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सावातही डीजेच्या दणदणाटाला बंदी असणार आहे. केवळ दोन साउंड लावण्याला आणि आवाजाची मर्यादा राखण्याची काळजी मंडळानी घ्यायची आहे, असे आवाहन सांगवी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
         येत्या ११ ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार असून, या पार्श्वभूमीवर सांगवी पोलीस ठाण्याच्यावतीने नवी सांगवीतील अय्यापा सभागृहात नवरात्रौत्सव मंडळंसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे आणि सांगवी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांनी मार्गदर्शन केले.
         या उत्सवात स्पीकर रात्री १० वाजता बंद केले जावेत. रात्री दहा वाजल्यानंतर स्पीकर सुरू ठेवणाऱ्या मंडळावर कारवाई अटळ आहे. मंडळ परिसरात बॅनर लावताना भाई, दादांचे फोटो असतील असे बॅनर लावू नका. चांगल्या लोकांचे फोटो असतील असे बॅनर असावेत. धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन करू नका. मद्यपान कटाक्षाने टाळून सणाचे पावित्र्य पाळावे.
तिकिटे घेऊन दांडियाला परवानगी नाही :
       मंडळाच्या परिसरात दांडियाला परवानगी आहे. मात्र, पैसे घेऊन दांडिया खेळण्याला परवानगी दिली जाणार नाही. अशा मंडळावर कठोर कारवाई केली जाणार आहे. दांडिया खेळायला येणाऱ्या मुला मुलींची माहिती मंडळाकडे असायला हवी.
मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य :
       नवरात्रौत्सवात आयोजित दांडिया खेळताना मुलींची सुरक्षितता महत्वाची आहे. अनेकदा मुली पळून जाण्याचे किंवा अपहरण, खून असे प्रकार घडताना दिसतात. राज्यभरात दांडियामध्ये ३०७ मुलींचे खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मंडळानी मुली, महिलांच्या सुरक्षिततेला महत्त्व द्यावे.
डीजे’वर १०० टक्के बंदी :
      या उत्सवातही ५० डेसिबल आवाजापेक्षा जास्त आवाजात डीजे, स्पीकर लावण्याला बंदी आहे. डीजे लावल्याचे निदर्शनास आल्यास शंभर टक्के कारवाई करण्यात येईल.
 महापालिकेने मूर्तिची काळजी घ्यावी :
        विसर्जित करण्यात आलेल्या देवीच्या मूर्ती विसर्जन घाटावर पडून राहणार नाहीत, याची महापालिका प्रशासनाने काळजी घ्यावी.  महापालिकेने घाटावर मूर्ती पडून राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
नशामुक्ती बाबत जनजागृती व्हावी :
         मंडळानी नशामुक्ती, व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे व्यसनाधीनतेला आळा बसण्यास मदत होईल.
रावण दहन करताना घ्या काळजी :
      रावणदहन करताना फटाक्यांचा वापर टाळणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून आगीची घटना घडून नागरिकांना इजा होणार नाही.

Share this Newz