माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Share this Newz

द न्यूज बिझ टाईम्स, पिंपरी  : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, तसेच सांगवीच्या विकासाचे शिल्पकार माजी महापौर अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रभाग क्रमांक ३२ मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

स्व. नानासाहेब शितोळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सांगळे, डॉ. सुप्रिया बिरादार, सांगवी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब वरुडे, आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना, उद्योजक अजय शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, शिवराज शितोळे, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, हर्षदा वाजे, सविता इंगवले, भटू शिंदे, ज्येष्ठ नागरिक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, पुण्यस्मरण दिनानिमित्त नानासाहेब शितोळे यांच्या आवडीनिवडी जपत विविध उपक्रम घेण्यात आले. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे कबड्डी व खो-खो, तर इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ व कॅरम यासारखे खेळ घेण्यात आले. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘लोकप्रतिनिधीकडील नेतृत्वगुण’ विषयावर निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी नानासाहेब शितोळे यांच्या स्मृती जागवत कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. तसेच समाजातील आरोग्य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. डॉ. तृप्ती सांगळे यांनी पावसाळ्यात होत असलेल्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अतुल शितोळे म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदा घंटागाडी सुरू करण्यात नानासाहेब शितोळे यांची अग्रगण्य भूमिका होती. नानासाहेब वरुडे यांनी सांगवी परिसराचा विकास बघितल्यास नानासाहेब शितोळे यांची दूरदृष्टी लक्षात येते, असे सांगितले. आरती राव यांनी प्रास्ताविक करताना नानासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडून दाखवले. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रणव राव यांनी नानासाहेबांच्या राजकारणातील व सामाजिक कार्यातील योगदानाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बर्गे यांनी, तर आभार स्वाती तोडकर यांनी मानले.


Share this Newz