फॅशन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या सुवर्णसंधी : प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने फॅशन, सॉफ्टवेअर, पर्यटन, रिटेल, सौंदर्य अशा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. व्यावसायिक शिक्षणाद्वारे क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत रोजगाराची नवनवीन दालने खुली होत आहेत. त्यामुळे फॅशन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या वाढत असलेल्या संधी व कुशल मनुष्यबळाची निकड लक्षात घेता यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये करिअरच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व फॅशन टेक्नॉलॉजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ब्लॉक प्रिंटिंग व झरदोजी एम्ब्रोईडरी’ यावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. विजय घाडगे, विभाग प्रमुख प्रा. दिपाली जोशी, समन्वयक प्रा. अनुष्का जगदाळे उपस्थित होते.

विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. विजय घाडगे यांनी फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त या कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. तसेच या कार्यशाळेमधून नवीन उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थी विकास मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी गुजरात राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर असताना जगप्रसिद्ध पाटोला साडी बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिलेली असताना तेथील अनुभव व वस्त्रकलेचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर सादर करत त्यांच्याशी संवाद साधला.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी शुभांगी जवळगेकर यांनी हस्तलिखित कलेमध्ये आपल्या कल्पकतेने आपण कशा प्रकारे नाविन्यपूर्णता आणू शकतो यावर मार्गदर्शन करत भारतातील विविध राज्य व तेथील प्रसिद्ध वस्त्रांची माहिती दिली. तसेच ब्लॉक प्रिंटिंग, व्हेजिटेबल कलर, टेक्निक्स, डिसाईन व बॉर्डर प्लेसमेंट, सिंगल व डबल कलर यावर प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी झरदोजी एम्ब्रोईडरीवर माहिती देताना मुनाजीर शेख यांनी प्रत्यक्षात हस्तकलेद्वारे कपड्यांवर आकर्षक डिझाईन कसे केले जाते यावर सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पांगारे, तर आभार प्रा. प्रीती जोशी यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. दिपाली जोशी, प्रा. प्रीती जोशी, प्रा. अनुष्का जगदाळे, प्रा. श्रद्धा महिंद्रकर, प्रा. स्वाती अग्रवाल, प्रणित पावले यांच्यासह विद्यार्थी विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz