द न्यूज बिज् टीम, पुणे :
आद्य शिक्षिका, स्त्रियांच्या मुक्तीदात्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, सकाळ सत्र प्रमुख डॉ. वंदना पिंपळे आदी उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संपुर्ण समाजावर अनिष्ट रुढी आणि परंपरा यांचा पगडा असताना महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य व भिडे वाड्यामध्ये सुरू केलेली मुलींची पहिली शाळा यांवर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच महापुरूषांची फक्त जयंती साजरी न करता त्यांच्या चरित्र व कार्यामधून आदर्श घेणे गरजेचे आहे, असे नमूद करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा दाखला दिला.
यावेळी डॉ. वंदना पिंपळे, डॉ. माया माईनकर, डॉ. क्रांती बोरावके यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.
कोविड – १९ विषयक शासन नियमांचे पालन करत महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर तर आभार प्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले.







Leave a Review