द न्यूज बिज् टीम, पुणे :
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ॲनिमिया मुक्त भारत’ अंतर्गत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये आरोग्य समिती व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सांगवी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ॲनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव लक्ष्मणराव पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, समिती समन्वयक डॉ. वैशाली बन्सोड, सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. रवींद्र मंडपे, डॉ. सुप्रिया बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता आयोजित या ॲनिमिया तपासणी शिबीराचे महत्त्व स्पष्ट करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांकरीता मानसिक तंदुरुस्ती बरोबरच उत्तम शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विशद करत केले. तसेच कोविड – १९ काळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग व प्राणायामाचे महत्व स्पष्ट करत उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन व्यायाम व चालण्याचा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
लक्ष्मणराव पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याप्रती सजग राहत आयोजित केलेले ॲनिमिया तपासणी शिबिर खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे, असे गौरवोद्गार काढत महाविद्यालयाचे अभिनंदन केले. त्याचबरोबर शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आघाडीवर काम करू शकतो, असे नमूद करत वयाच्या ऐंशीव्या वर्षीही तरुणालाही लाजवेल असे अविरतपणे कार्य करणारे शरद पवार यांचे उदाहरण उपस्थितांना दिले.
ॲनिमिया संदर्भात विविध विभागाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिनची कमतरता, शारीरिक अशक्तपणा यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ११.३३ टक्के मुले, तर २३.७७ टक्के मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण आढळून आले. या विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळ्या व योग्य औषधे देत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यासाठी सांगवी रुग्णालयाच्या आरोग्य विभागातील आशा वदुरकर, कविता नारायणकर, सीमा कोढवाल, मंजुळा मंडळावर, अनिकेत वाघमारे यांच्या चमूने विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय घाडगे, सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पांगारे, तर आभार डॉ. दीपाली चिंचवडे यांनी मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. माया माईनकर, प्रा. रत्ना चौधरी, प्रा. सुषमा चव्हाण, प्रा. ज्योती जाधव, प्रणित पावले, सचिन शितोळे, रोहिदास खोंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.







Leave a Review