पुण्यातील तीन बांधकाम व्यवसायिकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

पुण्यातील तीन नामांकित बांधकाम व्यवसायिकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र बाळानाथ भुंडे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. मुकेश मनोहर येवले, शाम जग्गनाथ शेंडे आणि सुनील पोपटलाल नहार अशी आरोपींची नावे आहेत.

अस्तीत्वात नसलेला रस्ता दाखवून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे.  त्याचबरोबर, फिर्यादी राजेंद्र भुंडे यांचे इमारती खालील पार्किंग परस्पर इतरांना विकून फसवणूक केल्याचा आरोप देखील या तिघांवर आहे. बावधन येथील पेब्बल अरबनिया या बांधकाम प्रकल्पात हा सर्व गैरप्रकार घडला आहे.
राजेंद्र भुंडे हे मूळ जागा मालक आहेत. त्यांनी येवले, शेंडे आणि नहार यांच्या एएसआर प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स या भागीदारी फर्मला पेब्बल अरबनिया या गृह प्रकल्पासाठी काही जागा दिली आहे. या प्रकल्पाच्या जवळ भुंडे यांची दुसरी पाच गुंठे जागा आहे. हि जागा त्यांनी येवले यांना दिलेली नाही. मात्र, या जागेतून येवले यांनी बेकायदा रस्ता बनवल्याचे भुंडे यांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या वादातून भुंडे यांनी पीएमआरडीए , जिल्हाधिकरी कार्यालय येथून अधिक माहीती घेतली असता, धक्कादायक माहीती समोर आली. अस्तित्वातच नसलेला १२ मीटरचा रस्ता दाखवून येवले यांनी बांधकाम आराखडा मंजूर करून घेतल्याचे भुंडे यांच्या निदर्शनास आले.

तसेच, आजही प्रत्यक्षात ज्या ठिकाणी घरे आहेत त्या जागी रस्ता असल्याचे दर्शवून येवले यांनी पीएमआरडीकडून बांधकाम आराखडा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी भुंडे यांनी गुगल नकाशे आणि छायाचित्रे सादर केली आहेत. या प्रकल्पात सदनिकांबरोबर भुंडे यांना दिलेले पार्किंग येवले यांनी परस्पर इतरांना विकून फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील एक आरोपी शाम शेंडे यांनी शासकीय कागदपत्रात काही ठिकाणी स्वःताच्या नावाचा शाम वाणी असा उल्लेख केला आहे. फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी दोन वेगवेगळी नावे वापरली असल्याचे एफआयआर मध्ये म्हटले आहे.

भुंडे यांनी याविरोधात वेळोवेळी हिंजवडी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, हिंजवडी पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. भुंडे यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर हा गुन्हा गंभीर आणि दखलपात्र असल्याचे सांगत न्यायालयाने, गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे लागत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या तिघांनी फक्त माझीच नाही तर, फ्लॅट धारकांची, शासनाची आणि पीएमआरडीएची देखील फसवणूक केली असल्याचे भुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर तरी , पीएमआरडीएने कारवाई करावी . अशी मागणी त्यांनी केली आहे.


Share this Newz