विंगमधील रामेश्वर विद्यालयात तब्बल 31 वर्षांनी जागवल्या आठवणी ; स्मृती जागवताना विद्यार्थ्यांना झाले अश्रू अनावर

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, सातारा : 

तब्बल 31 वर्षांनी एकत्र येत विंग (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील रामेश्वर विद्यालयात दहावीच्या 1990 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. हा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पाडला. हे सर्व शक्य झाले सोशल मीडियामुळे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र करून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी साहेबराव तांगडे अणि वैजयंता शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. त्याचप्रमाणे विजय बांदल, दत्तात्रय तळेकर, संजय तळेकर, संतोष तळेकर, वर्षा महांगरे, शशिकला राऊत व अमिता गुजर यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

सर्व सन्मानिय गुरुवर्य यांना स्मृतिचिन्ह, शाल व छोटेसे रोप देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे कायमची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व लेखणी देण्यात आली. याप्रसंगी खुसपे सर, रामेश्वर विद्यालय विंगचे मुख्याधयापक श्री कदम सर व इतर दहा शिक्षक व दोन शिपाई उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वखुशीने जमा केलेल्या वर्गणीतून कोरोनामध्ये आई-वडील गमावलेल्या दोन विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक खर्च पुरेल एवढी देणगी देण्यात आली. शाळेला सरस्वतीची प्रतिमा भेट म्हणून प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील जुन्या आठवणींना व शिक्षकांच्या अनुभवांना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करताना अक्षरशः डोळ्यांमध्ये आलेले अश्रू थांबवता आले नाहीत. तर काहींचे कंठ दाटून आल्याने पुढे बोलणे अशक्य झाले. सर्वांनीच अतिशय चांगले अनुभव सर्वांसमोर व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री खुसपे सर यांनी मनोगत व्यक्त करताना आहार व व्यायाम याचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, की जे कच्चे आहे ते भाजून खाऊ नका, जे भाजलेले आहे ते शिजवून खाऊ नका. जे शिजवलेले आहे ते तळून खाऊ नका आणि जे तळलेले आहे ते कधीच खाऊ नका.

कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतला होता. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. प्रास्ताविक संजय तळेकर, अध्यक्ष निवड विजय बांदल, अनुमोदन हंबीरराव महांगरे, तर शिक्षकांचा परिचय व विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्याचे काम साहेबराव तांगडे यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेखा व विनोदी वातावरण तयार करून साहेबराव तांगडे यांनी सूत्रसंचालन केले. आणि कार्यक्रमातील सर्वांचे आभारही मानले. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाल्याबद्दल परिसरातून सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट पायंडा पाडल्याबद्दलही अभिनंदन करण्यात येत आहे.


Share this Newz