प्रशांत शितोळे यांच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमेळाव्यास सांगवीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, ज्ञानेश्वर टकले

जुनी सांगवीतील शितोळे, ढमाले, ढोरे, पवार, पोंगडे, कांबळे, शिंदे, कुंभार, ठाकर, चव्हाण, माकर व समस्त सांगवी गावकरी परिवाराच्या वतीने माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी गजानन महाराज मंदिरासमोर आयोजित स्नेहमेळाव्यास सांगवीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाळ गोपाळांसह सर्व वयोगटातील नागरिकांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थिती दर्शविली.

प्रशांत शितोळे यांनी “सोहळा तुमचा आमचा, सांगवी परिवाराचा” या आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात आकर्षक विद्युत रोषणाई, दिव्यांची आरास, संगीत मैफील व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सांगवीकरांनी सहकुटुंब लेझर शो, सेल्फी पॉईंटचा आनंद घेतला. मराठी मालिका देवमाणुस फेम अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्या उपस्थितीने सोहळ्यात रंगत आणली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनेत्री अस्मिता देशमुख हिस पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सण समारंभ, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध होते. परिस्थिती थोडी सुधारत असल्याने जुनी सांगवीकरांनी मोठ्या उत्साहाने या दीपोत्सव स्नेहमेळाव्यास उपस्थिती लावली. दिव्यांच्या झगमगाटाने गजानन महाराज मंदीरासमोरील प्रांगण उजळून निघाले होते. परिसरात आकर्षक हलती रोषणाई करण्यात आली होती‌. दिवाळी फराळ, संगीतमय मराठी, हिंदी गाण्यांची सुरेल मेजवानी, लेझर शो, नेत्रदीपक दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. विविध फुलांनी सजवलेला मंडप, फुलांनी सजवलेले फुलपाखरू, हरणांचा कळप, सिंह अशा प्रतिकृती सेल्फी पॉईंट जुनी सांगवीकरांचे आकर्षण ठरले. नागरिकांनी याचा उत्स्फूर्त आनंद लुटला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सचिन आहीर, खासदार श्रीरंग बारणे, राजु मिसाळ, अजित गव्हाणे आदींसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. फ्युजन म्युझिकल ग्रुपचे नितीन कदम व सहकारी यांनी उपस्थित रसिकांना मराठी भावगीते, भजन, अभंग, मराठी-हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाडुळे यांनी केले.

हा सोहळा समस्त सांगवीकरांचा होता. गतवर्षापासून कोरोनामुळे एकही मोठा सांस्कृतीक कार्यक्रम झाला नव्हता. यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सर्वसमावेशक नागरिक, मित्र परिवार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. हा सोहळा करण्याचे मला भाग्य लाभले, असे मी मानतो.     

– प्रशांत शितोळे, आयोजक व कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


Share this Newz