द न्यूज बिज् टीम, पुणे :
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाल्याने वापरकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सेवेमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा फटका बसला. या सहा तासात फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवघ्या काही तासांच्या तांत्रिक गोंधळामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्येही मार्क एक स्थानाने खाली घसरला.
एका जागल्याने (व्हिसलब्लोअरने) कंपनीसंदर्भात केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे सोमवारी उडालेल्या गोंधळामुळे मार्कला ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,४७,३४,८३,००,००० रुपयांचे (४४ अब्ज रुपयांचं) नुकसान झाले आहे. कंपनीच्या शेअर्सचीही मोठी पडझड झाली. फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले. सप्टेंबरच्या मध्यापासूनच कंपनीच्या शेअर्सला घरघर लागली असतानाच या तांत्रिक अडचणीच्या कारणामुळे कंपनीमधील गुंतवणूक काढून घेणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आणि शेअर्सचे भाव पडले. सोमवारी झालेल्या या घसरणीमुळे मार्कची संपत्ती १२ हजार १६० कोटी डॉलर्सवर आली आहे. ब्लूमबर्गच्या श्रीमंताच्या यादीमध्ये मार्क एका स्थानाने खाली घसरला असून, तो आता बिल गेट्स यांच्यापेक्षाही एका स्थानाने खाली गेला आहे.
मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असे मार्कने म्हटले आहे.
तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवेत व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले, तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेले नाही. ‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला. नवे संदेश मिळत नसल्याची तक्रार लाखो वापरकर्त्यांनी केली.
(Source : Loksatta online)







Leave a Review