घोलप महाविद्यालयामध्ये जागतिक वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे : 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने संपूर्ण जगभरामध्ये १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये साजरा होणाऱ्या जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. लतेश निकम, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक करत असताना प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली बन्सोड यांनी सर्वप्रथम जागतिक वन्यजीव सप्ताहाची संकल्पना व महत्त्व उपस्थितांसमोर स्पष्ट केले. तसेच वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रमावर प्रकाश टाकला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी वन्यजीव सप्ताहाचे ब्रीदवाक्य भारतातील प्राणी आणि प्राण्यांचे संरक्षण असुन विविध भारतीय प्रजातींचे जीव वाचवण्याच्या दृष्टीने वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली असे नमूद करत जैवविविधतेमधील प्राण्यांचे महत्त्व स्पष्ट करत पर्यावरणीय संवर्धनाच्या गरजेवर भर दिला.
उद्घाटन सत्रामध्ये ‘भारतातील मनोरंजक पक्षी’ या विषयावर मार्गदर्शन करताना पश्चिम बंगाल येथील विद्यासागर शिशू निकेतन या स्वयंसेवी संस्थेच्या पक्षी अभ्यासक आत्मजा दास यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये प्रागैतिहासिक काळामधील पक्ष्यांच्या प्रजाती, जैविक वर्गीकरण, भारतामधील विविध प्रदेशामधील पक्षी व त्यांचे जैवविविधतेमधील महत्व इत्यादी घटकांवर सादरीकरणासह भाष्य केले. विशेषतः विविध रंगीबेरंगी पक्ष्यांच्या प्रजातींच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.

याप्रसंगी बी.एस्सी.द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वन्यजीव, समुद्री जीव, प्रदूषण व त्याचे परिणाम, वने, जैवविविधता यांवर आधारित ऑनलाइन पोस्टर प्रदर्शन केले.
गुगल मीटवर आयोजित सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सुमारे ६० पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. विजय घारे, डॉ. राणी भगत, डॉ. माया माईनकर, प्रा. जितेंद्र वडशिंगकर, प्रा.सद्दाम घाटवाले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Share this Newz